Join us

“आमची गरज नाही मग पक्षात राहून काय करु?”; आणखी एक नेता काँग्रेस सोडण्याच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 11:54 PM

Mumbai Congress News: काँग्रेस पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करत आणखी एका नेत्याने पक्ष सोडण्याबाबत स्पष्ट शब्दांत संकेत दिले आहेत.

Mumbai Congress News: आगामी लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशी काँग्रेस पक्षाला एकामागून एक गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई काँग्रेसचे मोठे नाव असलेले मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला रामराम केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर आता आणखी एक नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. खुद्द या नेत्यानेच तसे संकेत दिले आहेत.

एकीकडे काँग्रेसला गळती लागली असताना दुसरीकडे नेते पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. शिवसेनेसारखी दुटप्पी पार्टी आजपर्यंत नाही बघितले. जेव्हा वज्रमुठ सभा झाली तेव्हा उद्धव ठाकरे येऊन म्हणतात की माझ्या हिंदू बांधव आणि भगिनी. बाबरीविषयी विधाने करतात. आम्ही बीकेसीच्या एकाच मंचवर बसलो होतो. लाज वाटते का? अशा पक्षांसोबत काँग्रेस कशी जाऊ शकते? भारत जोडो यात्रेत गेलो तर मला हाकलून दिले.  राहुल गांधी यांची टीम फार वाईट आहे, या शब्दांत काँग्रेस नेते आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी पक्षाबाबतची मते तीव्र शब्दांत व्यक्त केली. 

मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, त्यांचा फोन मी उचलला नाही. त्यांनी आधी आपला मतदारसंघ बघावा. ज्या गोष्टी सुरु आहेत त्यामुळे काँग्रेसची अल्पसंख्यांक मते कमी होतील. त्यांना जर आमची गरज नसेल तर आमचा विचार करायला आम्ही समर्थ आहोत. जर आधी विचारले असते की, काँग्रेसमध्ये राहणार का? तर हो म्हणालो असतो पण आता सांगू शकत नाही की काँग्रेसमध्ये राहीन. काँग्रेसला आमची गरज नाही मग मी पक्षात राहून काय करू? आम्हाला पर्याय आहेत. मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन, असे झिशान सिद्दीकी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झिशान सिद्दीकी हे ही आता काँग्रेसचा हात झटकण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :काँग्रेसराजकारण