मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आगामी निवडणूका शिवसेना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका लक्षात घेता मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी नवा अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेस पक्षात आता हलचाली सुरू झाल्या आहेत. अनेक इच्छुकांनी आपली या जागेवर निवड होण्यासाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
मुंबई काँग्रेसच्या गटबाजीला मूठमाती देण्यासाठी मुंबई काँग्रेसचे नवीन अध्यक्ष म्हणून म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ.अमरजीत सिंग मनहास आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांची नावे आता पुढे आली आहेत. काँग्रेसमध्ये सर्व निर्णय दिल्ली हायकमांड घेत असते. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोणाचे नाव घोषित होईल हे आताच काही सांगता येणार नसले तरी,डॉ.अमरजीत सिंग मनहास की सुरेश शेट्टी यांच्यापैकी एकावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांच्या नावांमुळे इतर सर्व नावे मागे पडलेली असल्याची आजही खात्रीलायक माहिती असल्याचे सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राज्य सरकारमधील सत्तेचा वापर काँग्रेसची पक्ष संघटना वाढीसाठी करण्याची गरज असल्याचे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांचे मत आहे.
महाआघाडीतील सर्व पक्ष 2022 च्या महापालिका निवडणुकीसाठी मेहनत करत असताना मुंबई काँग्रेस मध्ये मरगळल्याचे वातावरण आहे. माजी आमदार मधू चव्हाण, माजी मंत्री नसींम खान , चरण सिंग सप्रा यांची नावे चर्चेत आली होती,मात्र ही नावे मागे पडली असल्याचे समजते.
पक्षातील सर्व जणांना एकत्र ठेवणे , नम्रतेने वागणे कार्यकर्त्यांना मानाने वागविणे या सर्व बाबींमुळे सर्व नावांच्या शर्यतीत मनहास किंवा शेट्टी यांच्या पैकी एका नावाला सहमती होत असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजते.मात्र शेट्टी यांनी 2019ची निवडणूक लढवली नव्हती, तर ते सध्या राजकारणा पासून दूर आहेत.तर 2007च्या पालिका निडणुकीत काँग्रेसचे 77 नगरसेवक निवडणून आणण्यात मनहास यांचा सिहांचा वाटा होता.
दिवंगत खासदार गुरुदास कामत,माजी अध्यक्ष जनार्दन चांदूरकर हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असतांना मनहास हे कोषाध्यक्ष होते. मिलिंद देवरा ,प्रिया दत्त यांच्या गटातील पदाधिकारी देखील मनहास यांना पाठिंबा देतील असे काँग्रेसच्या माजी आमदाराने सांगितले आहे. त्यामुळे संघटन एकत्र ठेवू शकेल आणि नम्रतेने सर्वांचे सुयोग्य नियोजन करू शकेल म्हणून अमरजीत सिंग मनहास यांच्या नावाची घोषणा दीपावलीच्या पूर्वसंध्येला होऊ शकते असे समजते.