Join us

मुंबई काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण : मनसेचे नेते संदीप देशपांडेंसह 8 जणांना पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2017 2:04 PM

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( 1 डिसेंबर ) मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली.

मुंबई - फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( 1 डिसेंबर ) मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या 8 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

गुन्ह्यातील बांबू, लोखंडी रॉड आणि मोटारसायकल जप्त करायची असून तपास बाकी असल्याचे सांगत पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. शनिवारी दुपारी 1 वाजता किल्ला कोर्ट 37 वे न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एस. अराध्ये यांच्यासमोर हजर केले.  

नेमके काय आहे प्रकरण?फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीने आता उग्ररूप धारण केले आहे. विक्रोळी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक संदीप देशपांडेसह आठ मनसैनिकांना अटक केली आहे. सकाळी काँग्रेसचे कार्यालय उघडल्यानंतर काही मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड केली.

अवघ्या काही सेकंदांत कार्यकर्ते तिथून पसार झाले. त्यानंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचे झेंडे व राज ठाकरे यांचे फोटो जाळले़ मनसेने केलेल्या या हल्ल्याचे वृत्त कळताच काँग्रेस नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काँग्रेसचे आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर जमा झाले. माजी खासदार गुरूदास कामत, एकनाथ गायकवाड, यांच्यासह आमदार भाई जगताप, माजी आमदार मधुकर चव्हाण, कृपाशंकर सिंह यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

हा तर मनसेचा नेभळटपणा - निरुपममनसेच्या भेकड, षंढ आणि नेभळट कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली आहे. कार्यालयात कुणीही नसताना मनसेच्या भ्याड लोकांनी हल्ला केला. आमच्या कार्यालयापासून पोलीस ठाणे २५ मीटरवर असताना हा हल्ला झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करायला हवी. तसे न झाल्यास आमच्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला आहे.

‘र्इंट का जवाब पत्थर से मिलेगा’‘भय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्जिकल स्ट्राइक’, ‘र्इंट का जवाब पत्थर से मिलेगा’ असे ट्विट करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

वैचारिक मतभेद असले तरी ते व्यक्त करण्याची ही पद्धत नव्हे. मुद्दे संपले की मग लोक गुद्द्यांवर येतात. पोलिसांनी योग्य कारवाई करावी आणि मनसेने नुकसानभरपाई द्यावी. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मनसेने काँग्रेसचे कार्यालय फोडण्यापेक्षा सीमेवर जाऊन दादागिरी दाखवावी. मुख्यमंत्र्यांनी भय्याभूषण पुरस्कार द्या म्हणणाºया मनसेला हॉकरभूषण पुरस्कार द्यायला हवा.- रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री, समाजकल्याण

 

टॅग्स :मनसेराज ठाकरेकाँग्रेसमुंबई