पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी विरोधात मुंबई काँग्रेसचा बैलगाडी, सायकल चालवत निषेध मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:59 PM2021-06-02T17:59:06+5:302021-06-02T17:59:44+5:30
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध. त्यावेळी निषेध नोंदवणाऱ्या स्मृती इराणी, हेमा मालिनी या नेत्या आता शांत का? काँग्रेसचा सवाल.
मुंबई - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल व डिझेलवरील दरवाढीविरोधात बोरिवली पूर्व येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबई काँग्रेसतर्फे आज मोर्चा काढण्यात आला होता. पेट्रोलची किंमत आज १०० रुपये प्रति लिटर पेक्षा जास्त झालेली आहे. मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल प्रचंड दरवाढीचा निषेध करण्यासाठी या मोर्चा दरम्यान मुंबई काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बैलगाडी व सायकल चालवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारचा निषेध केला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या १३० कोटी जनतेच्या अस्तित्वाच्या प्रश्नांची, त्यांच्या संवेदनांची जाण असेल, तर त्यांनी २०१४ पासून आज पर्यंत वाढवलेला १६ रुपये रोड सेझ रद्द करावा. २००५ पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पेट्रोलवर १ रुपया रोड सेझ लावला होता. २००५ नंतर १० वर्षे काँग्रेसचे सरकार असताना त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यात जरासुद्धा वाढ केली नाही आणि नंतर २०१४ मध्ये भाजपचे सरकार आल्यावर त्यांनी ७ वर्षांत त्यामध्ये १६ रुपये वाढ केली. आज कोरोनाच्या महामारीने देशाची सर्वसामान्य जनता अगोदरच त्रस्त झालेली असताना पेट्रोल व डिझेलची दरवाढ करून त्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे पाप तुम्ही का करताय? २०१४ पासून पेट्रोलवर वाढवलेला १६ रुपये रोड सेझ त्वरित रद्द करावा," अशी मागणी भाई जगताप यांनी केली.
स्मृती इराणी आता शांत का?
"या देशाची अर्थव्यवस्था जगातील ५वी अर्थव्यवस्था म्हणून दबदबा होता, ती आता मोदी यांनी वजा ७ केली आहे. ज्यावेळेस केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळीस पेट्रोलचा दर ६५ रुपये प्रति लिटर तर घरगुती गॅसचा दर ४०० रुपये प्रति सिलेंडर होता. त्यावेळेस भाजपच्या नेत्या स्मृती इराणी व हेमा मालिनीं कडेवर गॅसची शेगडी घेऊन पेट्रोल व गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करत होत्या. आज पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे, तर घरगुती गॅस ९०० रुपये प्रति सिलिंडर एवढा महाग झाला आहे. आता हे मोदी भक्त नेते मूग गिळून गप्प का आहेत? ही दरवाढ त्यांना दिसत नाही आहे का?," असा सवाल त्यांनी केला.
या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा देशातील सर्व सामान्य जनतेला फटका बसणार आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्यावर दैनंदिन व्यवहारातील वस्तूंच्या किमती सुद्धा वाढणार आहेत. मोदी सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये व ही पेट्रोल दरवाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली.