Join us

अंधेरीत महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसचा आक्रोश मोर्चा; राज्य व केंद्र सरकारचा केला निषेध

By मनोहर कुंभेजकर | Published: July 20, 2023 6:49 PM

सरकारच्या विरोधात आज मुंबईतील अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकासमोर मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 'महिला आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. 

मुंबई-देशात वाढलेल्या प्रचंड महागाई कडे केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार दुर्लक्ष करत आहेत आणि त्यावर कोणताही उपाय करत नाही. त्यामुळे सत्तेतील सरकारच्या विरोधात आज मुंबईतील अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकासमोर मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 'महिला आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. 

या मोर्चामध्ये माजी खासदार संजय निरूपम, आमदार अस्लम शेख, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी आमदार मधू चव्हाण व अशोकभाऊ जाधव, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अनिशा बागुल तसेच मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रचंड महागाईमुळें गृहिणी व महिलांचे बजेट संपूर्णपणे कोलमडलें असल्याने या आक्रोश मोर्चामध्ये महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

देशामध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सोबत आता रोजच्या जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व भाज्यांच्या दरांमध्ये देखील प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. या प्रचंड महागाईमुळे राज्यातील सर्वसामान्य गरीब जनता होरपळून निघाली आहे. भाज्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत.महागाईने जनता होरपळत असताना त्याकडे दुर्लक्ष करून फक्त सत्तेच्या राजकारणात व्यस्त असलेल्या शिंदे व फडणवीस सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार विरोधात सर्व आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त केला. 

टॅग्स :काँग्रेसआंदोलनमहागाई