पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसचा बोरिवलीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:35+5:302021-06-03T04:06:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल व ...

Mumbai Congress rallies in Borivali against petrol and diesel price hike | पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसचा बोरिवलीत मोर्चा

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसचा बोरिवलीत मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल व डिझेलवरील प्रचंड दरवाढीविरोधात बोरिवली पूर्व येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबई काँग्रेसतर्फे बुधवारी मोर्चा काढण्यात आला.

पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त झाली आहे. मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी या मोर्चादरम्यान मुंबई काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बैलगाडी व सायकल चालवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारचा निषेध केला. या मोर्चात भाई जगताप व चरणसिंग सप्रा यांच्यासह मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक सुत्राळे, शिवजीत सिंह, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष कालू बुधेलिया, कोषाध्यक्ष भूषण पाटील, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. अजंता यादव, सहखजिनदार अतुल बर्वे, मुंबई काँग्रेसच्या रश्मी मेस्त्री, किशोर सिंह तसेच उत्तर मुंबईतील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील १३० कोटी जनतेच्या अस्तित्वाच्या प्रश्नांची, त्यांच्या संवेदनांची जाण असेल, तर त्यांनी २०१४पासून आजपर्यंत वाढवलेला १६ रुपये रोड सेझ रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. २००५पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पेट्रोलवर १ रुपया रोड सेझ लावला होता. २००५नंतर १० वर्षे काँग्रेसचे सरकार असताना त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यात जरासुद्धा वाढ केली नाही आणि नंतर २०१४मध्ये भाजपचे सरकार आल्यावर त्यांनी ७ वर्षांत त्यामध्ये १६ रुपये वाढ केली. आज कोरोनाच्या महामारीने देशाची सर्वसामान्य जनता अगोदरच त्रस्त झालेली असताना, पेट्रोल व डिझेलची दरवाढ करून त्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे पाप तुम्ही का करता? २०१४पासून पेट्रोलवर वाढवलेला १६ रुपये रोड सेझ त्वरित रद्द करा, अशी मागणी भाई जगताप यांनी केली.

ते म्हणाले की, या देशाची अर्थव्यवस्था जगातील ५वी अर्थव्यवस्था म्हणून दबदबा होता. ज्यावेळेस केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळेस पेट्रोलचा दर ६५ रुपये प्रति लीटर तर घरगुती गॅसचा दर ४०० रुपये प्रति सिलिंडर होता. त्यावेळेस भाजपच्या नेत्या स्मृती इराणी व हेमा मालिनी या कडेवर गॅसची शेगडी घेऊन पेट्रोल व गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करत हाेत्या. आज पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे, तर घरगुती गॅस ९०० रुपये प्रति सिलिंडर एवढा महाग झाला आहे. आता हे मोदी भक्त नेते मूग गिळून गप्प का आहेत? ही दरवाढ त्यांना दिसत नाही का? असा प्रश्न त्यांनी केला. या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा देशातील सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्याने दैनंदिन व्यवहारातील वस्तूंच्या किमतीसुद्धा वाढणार आहेत. मोदी सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये व ही पेट्रोल दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.

---------------------------------------

Web Title: Mumbai Congress rallies in Borivali against petrol and diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.