मुंबई काँग्रेस प्रवक्ते अरुण सावंत यांचा राजीनामा
नवी कार्यकारिणी अन्यायकारक असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी साेमवारी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. पक्षाच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत निष्ठावंत आणि धडाडीने काम करणाऱ्यांना डावलण्यात आले असून, निवडक नेत्यांच्या पाठीमागे घुटमळणाऱ्यांना स्थान देण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केला.
मुंबई काँग्रेसच्या १७० जणांच्या कार्यकारिणीची रविवारी घोषणा करण्यात आली. पक्षातील सर्व गटांना सामावून घेण्याचा यातून प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, अनेक पदाधिकाऱ्यांचा नव्या यादीत समावेश नाही, तर कित्येक पदाधिकारी आहे त्याच पदांवर आहेत. एकीकडे नवख्या आणि एखाद्या गटाशी संबंधित असणाऱ्यांना वरची पदे मिळाली. पण जुने सचिव त्याच पदावर असल्याची चर्चा केली. त्यातच साेमवारी सावंत यांनी नव्या कार्यकारिणीत स्थान दिले नसल्याने नाराजी व्यक्त करत आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला. २१ वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. सहा वर्षांपासून प्रवक्ते पद सांभाळत आहे. ५४० चर्चांमध्ये भाग घेत विरोधकांशी संघर्ष केला. मात्र गटातटाच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप पक्षाचे सदस्यत्व सोडले नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
उत्तर मुंबई जिल्हा वर्षानुवर्षे दोनच उत्तर भारतीय नेते चालवत आहेत. काम करणाऱ्यांना संधी मिळणार नसेल, नेत्यांच्या पाठीराख्यांचीच वर्णी लागणार असेल तर १७० जणांची ही कार्यकारिणी मुंबईतील २२७ जागांवर कसा संघर्ष करणार, असा सवालही सावंत यांनी केला.