मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून मुंबईतील ३६ पैकी २९ जागा काँग्रेस लढविणार असून सात जागी राष्ट्रवादी आपले उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली आहे.आघाडीच्या जागावाटपाबाबत कोणताच वाद नसून चर्चा आणि सहमतीने निर्णय होत आहे. यात मुंबईतील ३६ जागांपैकी अणुशक्ती नगर, वरळी, कुर्ला आणि विक्रोळी या चार जागा राष्ट्रवादी लढविणार असल्याचे नक्की झाले आहे. उर्वरित तीन जागांची नावे लवकरच निश्चित केली जातील. या चारही जागांवर सद्या शिवसेनेचे आमदार आहेत.
युती आणि आघाडीने मागील विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. त्यात मुंबईतील ३६ पैकी १४ जागांवर भाजप तर १३ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. सहा जागांवर काँग्रेसचे आमदार निवडून आले होते तर एमआयएम आणि समाजवादी पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळाली. राष्ट्रवादीला मात्र मुंबईत आपले खाते उघडता आले नव्हते. त्यातच राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाची स्थिती आणखीनच बिकट झाली आहे.