मुंबई : काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ब्लाॅक अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडून पसंतीच्या उमेदवाराचे नाव ऑनलाइन मागविण्यात आले आहे. या नावांबाबत संबंधितांशी चर्चेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येईल. येत्या एक ते दोन आठवड्यांतच मुंबई अध्यक्षाची घोषणा होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेश प्रभारी एच.के. पाटील यांनी दिली.अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीचा मोठा इतिहास मुंबई काँग्रेसला आहे. गेल्या काही वर्षांपासून तर सातत्याने अंतर्गत लाथाळ्या सुरू होत्या. ऎन लोकसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन अध्यक्ष संजय निरुपम यांच्या जागी मिलिंद देवरा यांना मुंबई अध्यक्ष करण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत अवघ्या तीन महिन्यांत देवरा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ गायकवाड यांच्याकडे कारभार सोपविण्यात आला. मात्र, आता आगामी पालिका निवडणुका लक्षात घेत नव्या सक्षम नेत्याकडे पक्षाचे अध्यक्षपद सोपविण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर प्रदेश प्रभारी पाटील यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांकडून आपल्या पसंतीच्या एका उमेदवाराचे नाव आनलाइन मागविले.ब्लाॅक अध्यक्ष, विभागीय आणि मुंबईतील प्रदेश पदाधिकाऱ्यांसह तळागाळातील कार्यकर्त्यांकडून टेक्स्ट आणि व्हाॅइस मेसेजने प्रत्येकी फक्त एक नाव मागविण्यात आले. कार्यकर्त्यांनी सुचविलेले नाव गोपनीय ठेवण्याची हमी देतानाच ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने मोबाइलवरून पार पाडण्यात आली. याबाबतचा तपशील जमा करण्याचे काम पूर्ण झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. संबंधित नावांबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्याबाबतचा अहवाल काँग्रेस अध्यक्षांकडे सादर केला जाईल. एक-दोन आठवड्यांतच मुंबई अध्यक्षाचे नाव जाहीर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यांची नावे आघाडीवरअध्यक्षपदासाठी अमरजीतसिंह मनहास आणि भाई जगताप यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय नसीम खान, सुरेश शेट्टी, मधुकर चव्हाण, चरणसिंह सप्रा, एकनाथ गायकवाड यांच्याही नावांच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. तर, माजी अध्यक्ष राहिलेल्या संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्याकडूनही मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ओपिनियन पोल घेतले तरी चर्चेनंतरच अध्यक्षांची निवड- काँग्रेस प्रभारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 2:17 AM