मुंबई : कोरोनामुळे देशभर २५ मार्च पासुन टाळेबंदी जाहिर करण्यात आली. त्यामुळे देशातील आणि परदेशात जाणारी हवाई सेवासुद्धा ठप्प झाली. दि,२५ मार्च नंतरच्या विमान प्रवासासाठी ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्या प्रवाशांना साहजिकच हवाई प्रवास रद्द झाल्यामुळे आपल्या तिकीटावर पूर्ण परतावा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतू काही विमान कंपन्यांनी विमान सेवा सरकारी आदेशामुळे रद्द करावी लागल्याचे कारण पुढे करत प्रवाशांना परतावा नाकारला आहे, तर काही विमान कंपन्यांनी तिकीट रकमेच्या परताव्या ऐवजी क्रेडिट कुपन प्रवाशांना देऊ केले असुन हे कूपन ते येत्या ३ ते ६ महिन्यांत विमान प्रवासासाठी वापरु शकतील असे कळवले आहे. सर्वच हवाई प्रवासी हे नियमितपणे हवाई प्रवास करतातच असे नाही. त्यामुळे बहुसंख्य प्रवाशी हे अशा क्रेडिट कुपन्सला विरोध करत असून आपल्याला तिकिटांचा रोख परतावाच मिळाला पाहिजे अशी मागणी करत आहेत. मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी लोकमतला ही माहिती दिली.
याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीने एक ऑन-लाईन सर्वेक्षण घेतले असून याबाबत हवाई प्रवाशांकडून त्यांची यासंबंधीची माहिती मागवली आहे. मुंबई ग्राहक पंचायत संबंधित विमान कंपन्या व नागरी हवाई मंत्रालयाबरोबर ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करून त्याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सर्वेक्षण शनिवार दि, ३० मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑन-लाईन उपलब्ध असेल. तरी सर्व संबंधित हवाई प्रवाशांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपल्या प्रवासाची माहिती पुरवावी असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे. यासाठी प्रवाशांनी मुंबई ग्राहक पंचायतीच्या www.mymgp.org या संकेतस्थळावर जाऊन सर्वेक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन अँड.शिरीष देशपांडे यांनी केले आहे.