मुंबई-संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक ग्राहक चळवळ आत्मनिर्भर आणि बलशाली करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा करत मुंबई ग्राहक पंचायतीने याबाबत संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यापार आणि विकास विभागाला (अंक्टाड) नुकताच एक प्रस्ताव सादर केला आहे.
युएनसीटीएडी तर्फे जिनीव्हा येथे दि,१ आणि दि,२ जुलैला आयोजित केलेल्या जागतिक ग्राहक संरक्षण परिषदेत मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने हा प्रस्ताव सुचवला आहे, अशी माहिती मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी लोकमतला दिली.
ग्राहक संस्था आणि ग्राहक चळवळीचं महत्त्व याची संयुक्त राष्ट्र संघाने दखल घेऊन त्यांच्या वार्षिक ग्राहक संरक्षण परिषदेत या विषयावर अर्ध्या दिवसाचे एक सत्र आयोजित केले होते. ग्राहक संस्था या बहुतांशी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने सरकारी निधी किंवा परकीय निधी पुरवठ्यावरच त्यांचे कार्य अवलंबून असते. त्यामुळे ग्राहक संस्थांच्या स्वतंत्रपणे, कोणाच्याही दडपणाला बळी न पडता ग्राहक हिताच्या मोहिमा घेण्याच्या कामात अनेकदा अडचणी येऊ शकतात. अनेक ग्राहकोपयोगी प्रकल्प निधीअभावी हाती घेता येत नाही. स्वतंत्र ग्राहक संस्थाच ग्राहक चळवळ खऱ्या अर्थाने वृध्दिंगत आणि सक्षम करू शकतील या वास्तवाची दखल घेत या परिषदेत सविस्तर चर्चा-विचारांचे आदानप्रदान झाले. याबाबत विविध उपायही सुचवण्यात आले.
मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे, कार्योपाध्यक्ष अनुराधा देशपांडे आणि संस्थेच्या तंटा-निवारण "समेट"च्या प्रबंधक अँड. पूजा जोशी-देशपांडे यांनी कृती आराखड्याचे सादरीकरण केले.
या प्रसंगी चर्चेत हस्तक्षेप करताना मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे त्यांच्या अनोख्या आणि पर्यावरणस्नेही वाण सामान वितरण व्यवस्थेबद्दल आणि बहु-आयामी ग्राहक पंचायत पेठांबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली. जगात आज असंख्य ग्राहक संघटना असल्या तरी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण संस्था या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच असून यात मुंबई ग्राहक पंचायत ही एक ग्राहक संस्था असल्याचे देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.
या दोन उपक्रमांमुळे मुंबई ग्राहक पंचायत आर्थिक दृष्ट्या कशी आत्मनिर्भर झाली आहे हे दाखवून हे दोन उपक्रम संयुक्त राष्ट्र संघ आणि कंझ्युमर्स इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने अन्य देशांतील ग्राहक संस्थांना कसे राबवता येतील याचा कृती आराखडाच मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने या परिषदेत सादर केला. त्याचे उपस्थितांनी स्वागत केले अशी माहिती अँड.शिरीष देशपांडे यांनी दिली.