Join us

Mumbai Corona Guidelines: मुंबईत आता कडक नियम! सोसायट्यांना होणार मोठा दंड अन् घरं होणार सील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 7:39 PM

BMC Corona Guidelines: मुंबई महानगरपालिकेनं आता कोरोनाविरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे.

BMC Corona Guidelines: मुंबई महानगरपालिकेनं आता कोरोनाविरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे. कोरोना संदर्भात संसर्ग रोखण्यासाठी महत्वपूर्ण गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. इमारतीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले की मायक्रो कन्टेंटमेंट झोन जाहीर करण्यात येणार आहे आणि अशा इमारतींमध्ये कोरोनाचे नियम पाळण्यासंदर्भातील जबाबदारी संबंधित सोसायट्यांची असणार आहे. नियम मोडले गेल्यास सोसायट्यांना दंड ठोठवण्यात येणार आहे. 

कोरोना रुग्ण असलेल्या सोसायट्यांबाहेर मायक्रो कंन्टेटमेंट झोनची पाटी लावली जाणार आहे. कोरोनाचे रुग्ण असलेल्या इमारतीकडून नियम मोडले गेल्यास पहिल्या खेपेस १० हजार रुपयांचा दंड आणि वारंवार नियम मोडला गेल्यास २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे इमारतीच्या सोसायट्यांची जबाबदारी आता वाढली आहे. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सतर्क राहावं लागणार आहे. याशिवाय मायक्रो कंन्टेंटमेंट झोनच्या इमारतीसमोर एक पोलीस कर्मचारी नेमला जाणार आहे. 

सर्व चौपाट्या ३० एप्रिलपर्यंत बंदकोरोनाचा प्रसार वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असलेल्या मुंबईतील सर्व चौपाट्या ३० एप्रिलपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आपल्या विभागांतर्गत असलेल्या चौपाट्यांवर कडक पहारा ठेवण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. याबाबतचे परिपत्रक पालिका प्रशासनाने मंगळवारी काढले आहे.

गिरगाव, जुहू, दादर, माहीम, गोराई अशा काही प्रमुख चौपाट्या आहेत. या चौपाट्यांवर दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गिरगाव, जुहू अशा चौपाट्यांवर दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका असल्याने महापालिकेने आता सर्व चौपाट्या महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाबाधित रुग्ण फिरताना आढळण्यास गुन्हाइमारतीत ज्या घरात कोरोना रुग्ण आढळले आहेत ती घरं पूर्णपणे सील करण्याची जबाबदारी सोसायट्यांची असणार आहे. सोसायटीतील होम आयसोलेशनमध्ये असलेला पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिका