Mumbai Corona Updates: राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण दुसरीकडे राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट अजूनही सुरूच आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल १०,०१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ७,०१९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईत सध्या ७७ हजार ४९५ सक्रिय रुग्ण आहेत. चिंताजनक बाब अशी की रुग्ण संख्येसोबतच मृत्यूंचाही आकडा वाढताना दिसतो आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरातील बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ८१ टक्क्यांवर आलं आहे. तर आतापर्यंत ३ लाख ८२ हजार ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग आता ३८ दिवसांवर आला आहे. ३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यान कोरोना रुग्ण वाढीचा दर १.७९ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.