Join us

Mumbai Corona Updates: मुंबईतील ४ ठिकाण कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 8:56 PM

Mumbai Corona Updates: मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज वाढत आहे.

मुंबई: कोरोनाचा संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर आता १.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व - पश्चिम आणि चेंबूर असे काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. तर पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. (Mumbai Corona Updates)

राज्यात पुन्हा विक्रमी वाढ; आज जवळपास ५० हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, २७७ जणांचा मृत्यू

मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज वाढत आहे. दररोज सरासरी आठ ते नऊ हजार बाधित रुग्णांची नोंद होत आहे. सुरुवातीला चेंबूर, गोवंडी, वांद्रे या काही विभागांमध्ये रुग्ण वाढ दिसून येत होती. मात्र आता सर्वाच विभागांमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी ९०९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आता मुंबईत ६२ हजार १८७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा!

मुंबईतील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन ४४ दिवसांवर आला आहे. गोरेगाव विभागात हेच प्रमाण ३३ दिवस, वांद्रे पश्चिम येथे ३४ दिवस, अंधेरी पूर्व - जोगेश्वरी येथे ३७ दिवसांमध्ये, चेंबूर - गोवंडी विभागात ३७ दिवस आणि अंधेरी प. येथे ३८ दिवसांमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. दररोज सुमारे ४२ ते ४५ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. 

या विभागात सर्वाधिक वाढ

विभाग....दैनंदिन रुग्ण वाढ

  • पी दक्षिण...गोरेगाव...२.१४
  • एच पश्चिम....वांद्रे पश्चिम....२.०९
  • के पूर्व...अंधेरी, जोगेश्वरी..१.९०
  • एम पश्चिम, चेंबूर....१.९०
  • के पश्चिम अंधेरी...१.८२
  • एफ उत्तर..माटुंगा - सायन...१.७९
  • पी उत्तर ...मालाड....१.६४
  • आर दक्षिण...कांदिवली...१.६४

सर्वाधिक सक्रिय रुग्ण 

  • के पश्चिम...अंधेरी प. ४८४९
  • के पूर्व...अंधेरी पूर्व, जोगेश्वरी...४१७१
  • आर मध्य...३५४९
  • आर दक्षिण...३४८४
  • पी उत्तर....३४२३

पाचहून अधिक बाधित रुग्ण आढळल्यावर संपूर्ण इमारत सील करण्यात येते. सील करण्यात आलेल्या सर्वाधिक १६७ इमारती अंधेरी पश्चिम या विभागात आहेत. त्यापाठोपाठ परळ विभागात ८३, ग्रँट रोड- मलबार हिल येथे ७९, चेंबूर - गोवंडी परिसरात ५९ आणि भायखळा परिसरात ५७ इमारती सील आहेत.

लस घेतल्यानंतरही स्वयंशिस्त पाळा  पालिकेचे मुंबईकरांना आवाहन

कोरोना रुग्णांची संख्या आता पूर्वीपेक्षा तिप्पट झाली आहे. मात्र आजही सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याने धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर्वीप्रमाणे सक्रिय सहकार्य केल्यास या संकटावर पुन्हा नियंत्रण आणणे शक्य आहे. यासाठी लस घेतल्यानंतरही स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

कोरोना प्रतिबंधात शिथिलता आल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम मुंबईत सध्या दिसून येत आहेत. दररोज आठ हजारांहून अधिक बाधित रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने दररोज एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र कोरोनावर औषध उपचार आणि हमखास तोडगा नसल्याने नागरिकांनी जीवन शैलीमध्ये आलेली शिथिलता बदलण्याची गरज असल्याचे मत पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस