मुंबई – शहरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येचा धोका पाहता मुंबई महापालिकेने(BMC) खासगी रुग्णालयांसाठी नवी नियमावली काढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी जितक्या क्षमतेने रुग्णालयात बेड्सची व्यवस्था होती तेवढीच पुन्हा सक्रीय ठेवण्याचे निर्देश महापालिकेने हॉस्पिटलला दिले आहेत. बुधवारी एकाच दिवसांत कोरोनाचे १५ हजार रुग्ण सापडल्याने BMC प्रशासन सतर्क झाली आहे.
त्याचसोबत ज्या रुग्णांना याआधीच आजार आहे आणि त्यांना कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करुन घ्या. जर रुग्णालयात आधीच पेशंट दाखल असतील आणि बेडची कमतरता भासत असेल तर त्यांची परिस्थिती पाहून ३ दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात यावे. BMC ने सांगितले आहे की, हॉस्पिटलने ८० टक्के कोविड बेड आणि १०० आयसीयू वॉर्ड रुम उघडावेत. BMC च्या परवानगीशिवाय कुठल्याही रुग्णाला हे बेड देऊ नये. त्याचसोबत सर्व हॉस्पिटलने सरकारने निश्चित केलेले दरच आकारावेत. सर्व खासगी हॉस्पिटल कुठल्याही कोविड रुग्णाला दाखल करण्यापूर्वी BMC ची परवानगी घ्यावी लागेल.
इमारत सील करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा
BMC ने इमारत सील करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. बीएमसीच्या नव्या नियमांनुसार, कुठल्याही इमारतीच्या विंग, कॉम्प्लेक्स अथवा सोसायटीच्या एकूण फ्लॅटच्या २० टक्के फ्लॅटमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येईल. नव्या नियमावलीप्रमाणे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांना कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचे आहे. कोरोना रुग्णांना १० दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणं बंधनकारक आहे.
इमारत सील करण्याची प्रक्रिया
हायरिस्क असणाऱ्या लोकांना ७ दिवस विलिगीकरणात राहणं गरजेचे आहे. ५ व्या अथवा ७ व्या दिवशी कोरोना चाचणी करावी लागेल. सोसायटी व्यवस्थापन कमिटी कोरोनाबाधित कुटुंबाला रेशन, औषधं आणि अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देतील. इमारत सील करण्याची प्रक्रिया वार्डस्तरावर राबवण्यात येईल. कोरोनाबाबत मेडिकल ऑफिसर आणि वार्ड ऑफिसरद्वारे जारी करण्यात आलेल्या कोविड नियमांचे नागरिकांना पालन करावे लागेल. मुंबईत झोपडपट्टीहून अधिक कोरोनाबाधित इमारतीत सापडत असल्याने मुंबई महापालिकेने या नियमांत सुधारणा केली आहे.