Join us

Mumbai Corona Update: मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! आज २५१० नव्या रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा ८ हजारांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 7:34 PM

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं राज्याच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे. राज्यातील रुग्णवाढीत मुंबईत झपाट्यानं रुग्णवाढ होत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २५१० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

मुंबई-

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं राज्याच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे. राज्यातील रुग्णवाढीत मुंबईत झपाट्यानं रुग्णवाढ होत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २५१० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर २५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी गेल्या आठवड्याभरापासून रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन रुग्णवाढीच्या मुद्द्यावरुन चिंता व्यक्त केली. तसंच मुंबईत आजचा आजचा आकडा २ हजाराच्या पलिकडे जाईल असा अंदाज व्यक्त केला होता. टोपेंनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसत असून आज २५१० रुग्णांची नोंद झाल्याचं सरकारची चिंता वाढली आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा ८ हजार ६० इतका झाला आहे. 

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येत्या दोन दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्बंध आणखी कडक करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असा सूचक इशारा देखील आज राजेश टोपे यांनी दिला होता. आजची आकडेवारी पाहता आता निर्बंधांमध्ये आणखी भर पडणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे. 

मुंबईतील रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९७ टक्के इतकं नोंदविण्यात आळं आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका झाला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ६८२ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या १ कन्टेंन्टमेंट झोन आणि ४५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासांत मुंबईत एकूम ५१ हजार ८४३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई