Join us

Mumbai Corona Updates: धारावीनं पुन्हा 'करुन दाखवलं'! सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 7:41 PM

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून मुंबईसारख्या दाटवस्ती असलेल्या शहरानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठी कामगिरी केली आहे.

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून मुंबईसारख्या दाटवस्ती असलेल्या शहरानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठी कामगिरी केली आहे. मुंबईतील धारावी या दाटीवाटीच्या ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण आढळलेला नाही. शहराच्या दृष्टीनं ही अतिशय दिलासादायक बाब मानली जात आहे. 

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, धारावीत गेल्या २४ तासांत सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण आढळलेला नाही. तर धारावीत सध्या सक्रिया रुग्णांची संख्या फक्त ११ इतकी आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेत धारावी रुग्णवाढीचा हॉटस्पॉट ठरलं होतं. दिवसेंदिवस शेकडोंच्या संख्येनं धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढत होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं कोरोना विरुद्ध अभियान राबवून धारावीत घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली. 

धारावीसारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी कोरोना हाताळण्यासाठी मुंबई महापालिकेनं केलेल्या प्रयत्नांचं जगभरातून कौतुक झालं होतं. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही धारावी मुंबईकरांसमोर आदर्श ठरताना दिसत आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसधारावी