Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 01:41 PM2021-04-02T13:41:47+5:302021-04-02T13:42:54+5:30
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट होत असताना राजधानी मुंबईतील आकडेवारी चिंता वाढवणारी ठरत आहे.
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट होत असताना राजधानी मुंबईतील आकडेवारी चिंता वाढवणारी ठरत आहे. मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहरात कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती तर त्यांनी दिलीच पण नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या निष्काळजीपणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी राजकीय कार्यकर्ते आणि नेते देखील मास्क वापरण्याच्या नियमांकडे गांभीर्यानं घेत नसल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी मनसेवर निशाणा साधला.
"कोरोनाला टाळण्यासाठी मास्क वापरणं ही तर प्राथमिक गरज आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणं बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी गांभीर्यानं याकडे पाहिलं जात नसल्याचं दिसून येत आहे. अशा लोकांवर शंभर टक्के कारवाई केली जाईल", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मनसेला लगावला टोला
मनसेच्या नेत्यांकडून मास्क वापरणं टाळलं जात असल्याबाबत विचारला असताना किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टीका केली. "राजकीय नेते जनतेचं प्रबोधन करत असतात पण या जीवघेण्या रोगाबाबत आता नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या जनतेच्या मतांच्या आधारावर आपण निवडून येतो त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि कार्यकर्त्याचं काम आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरुन स्वत:च्या फायद्याचं राजकारण करणं चुकीचं आहे", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मंदिरांच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा
मुंबईतील धार्मिक स्थळ पुन्हा एकदा बंद करण्याचा विचार पालिका करत असताना भाजप नेत्यांकडून त्यास विरोध केला जात आहे. याबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी निर्बंध झुगारणाऱ्यांनी राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या आरोग्याच्या काळजीचा विचार करावा अशी टीका केली आहे. "राज्याचे मुख्यमंत्री राज्याची एका कुटुंबाप्रमाणे काळजी घेत आहेत. लॉकडाऊन कुणालाच नकोय. पण वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कठोर निर्णय घेणं गरजेचं होऊन बसलं आहे. भाजपवाल्यांनी रस्त्यावर उतरून काम करावं मग त्यांना लक्षात येईल", असं रोखठोक मत पेडणेकर यांनी व्यक्त केलं.
मुंबईची आकडेवारी चिंताजनक
मुंबईत काल ८ हजारांहून अधिक रुग्ण वाढले आहेत. दिवसेंदिवस शहरात वाढत्या रुग्णसंख्येबाबतही पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली. "सध्याची आकडेवारी पाहता येत्या दिवसांत रुग्ण मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू शकतात आणि यामुळे शहरात बेड्सची संख्या अपूरी पडू शकते. त्यामुळे या गोष्टींबाबत महापालिका गांभीर्यानं विचार करत आहे. काही लोक अजूनही निष्काळजीपणे वागत आहेत. त्यामुळे कठोर निर्बंध लादणं गरजेचं झालं आहे", असं पेडणेकर म्हणाल्या.