Mumbai Corona Updates: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारसमोर देखील चिंता निर्माण झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल ३६७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन सदृश निर्बंध लागू केले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत आज ३,६७१ रुग्णांची नोंद झाली आहे. काल हाच आकडा २,५१० इतका होता. गेल्या २४ तासांत ३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता ९६ टक्क्यांवर आलं आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा ११,३६० वर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५०५ दिवसांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर काल ०.१० टक्के इतका होता. आज त्यात वाढ होऊन ०.१४ टक्के इतका झाला आहे. मुंबईतील सातत्यानं होणारी रुग्णवाढ आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करुन तातडीनं कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. या बैठकीत वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील याआधीच येत्या दोन दिवसांत निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचं म्हणत सूचक इशारा दिला होता.