Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आर्थिक राजधानी मुंबईनं कोरोना रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवून दाखवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत सातत्यानं घट होताना दिसत असून महत्वाचीबाब अशी की मुंबईतील कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता ९१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. (Mumbai Corona Updates recovery rate at 91 percent and 2403 new cases in last 24 hours)
गेल्या २४ तासांत २ हजार ४०३ नवे रुग्ण आढळले असून ३ हजार ३७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांची संख्या आता ६ लाख १३ हजार ४१८ इतकी झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचलं असल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबत मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता १५३ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत २ मे ते ८ मे दरम्यान कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण अवघं ०.४४ टक्के इतकं नोंदविण्यात आलं आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत ३२ हजार ५९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून केवळ २ हजार ४०३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत सध्या ४७ हजार ४१६ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यातील रुग्णसंख्येतही घटमहाराष्ट्रातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढीचा आकडा देखील आज ५० हजाराच्या खाली आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ४०१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आज एकूण ५७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सकारात्मकबाब म्हणजे राज्यात आज ६० हजार २२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ४४ लाख ७ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.