धक्कादायक! मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये १० कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 01:01 PM2021-03-05T13:01:46+5:302021-03-05T13:47:34+5:30
mumbai coronavirus update : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत असल्याने लॉकडाऊनची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई : गेल्या महिन्यापासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. गुरुवारी देखील ११०३ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत असल्याने लॉकडाऊनची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता मुंबईतील एका रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. (mumbai coronavirus update : famous radhakrushna restaurant reports ten positive covid19 case)
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय, हे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. दरम्यान, काल पूर्ण हॉटेल सॅनिटाईज केले. आजपासून पुन्हा हॉटेल सुरू केले आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. मात्र, ९७ टक्के रुग्ण हे इमारतीत राहणारे असून केवळ दोन ते तीन टक्के लोक हे दाटीवाटीच्या वस्तीत राहतात. त्यामुळे सध्या लॉकडाऊनची वेळ आपल्यावर येईल, असे वाटत नाही, असे मत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चेंबूर, अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम, कांदिवली, बोरवली आदी विभागांची पाहणी केली.
लसीकरणावेळी गर्दी टाळण्यास प्रयत्नशील
गर्दी टाळण्यासाठी मुंबईत २९ खाजगी रुग्णालयाला केंद्र सरकारने लसीकरणाची परवानगी दिली आहे. महापालिकेच्या २३ आणि १६ खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. नागरिकांनी आधी नोंदणी करावी आणि नंतर केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन काकाणी यांनी केले.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
राज्यात गुरुवारी ८,९९८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून, ६० मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी ९ हजार ८५५ रुग्णांची नोंद, तर ४२ मृत्यू झाले होते. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी बाधितांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी बळींचा आकडा वाढला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २१,८८,१८३ झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ३४० आहे. सध्या ८५,१४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.