मुंबई महापालिका आर्थिक संकटात; मनपा आयुक्तांनी काढलं 'अतितात्काळ' परिपत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:38 PM2019-10-03T18:38:33+5:302019-10-03T18:40:03+5:30
'मुंबई महानगरपालिकेचे खाजगीकरण करण्याचा भाजप-शिवसेनेचा डाव' राष्ट्रवादीने केला गंभीर आरोप
मुंबई - मुंबई महानगरपालिकाचे ३० हजार कोटीचे बजेट असताना मनपा आर्थिक संकटात कशी येऊ शकते असा सवाल करतानाच भाजप - शिवसेना मनपाचे खाजगीकरण करण्याचा डाव आखत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान नवाब मलिक यांनी महापालिका आयुक्तांनी काढलेल्या 'अतितात्काळ' परिपत्रकाचा आदेश माध्यमांसमोर सादर केला. मुंबई मनपा कार्यालयातून परिपत्रक पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये २०१९ - २० बजेटमध्ये महसुली उत्पन्नात घट व महसुली खर्चात वाढ झाल्यास मनपा आर्थिक संकटात येवू शकते. मग मनपाचे बजेटमधील पैसे खर्च झाले कुठे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, भाजपाचे सदस्य @PrasadLadInd आणि शिवसेना-भाजपचे समन्वयक म्हणून ओळख असलेले निरज गुंडे यांनी मुंबई महानगरपालिकेला लुटले आहे. @ShivSena - @BJP4Maharashtra या दोन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेचे खासगीकरण करण्याचा डाव आखला आहे - @nawabmalikncppic.twitter.com/s4e68ZELtd
— NCP (@NCPspeaks) October 3, 2019
भाजपचे ठेकेदार प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत तर नीरज गुंडे हा प्रसाद लाड यांच्याजवळचा ठेकेदार असून तो सध्या मनपाची कामे घेत आहेत. खाजगीकरण करुन मनपा आयुक्त व ठेकेदार मनपाच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचे कटकारस्थान आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. प्रसाद लाड यांच्या जवळच्या ठेकेदारांना ठेका दिला गेला आहे. आता आयुक्तांनी काढलेल्या नोट मध्ये असा डाव असून थकीत कर वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय आयटी व तंत्रज्ञानाचा वापर करा असे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरुन नागपुरच्या कंपनीला म्हणजेच मुख्यमंत्री यांच्या जवळच्या कंपन्यांना कामे मिळावी यासाठी हे धोरण राबविले जात असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला.
महापालिकेचे बजेट ३० हजार कोटींचे आहे. मात्र, तरीही मुंबई शहराची परिस्थिती वाईट आहे. मुंबईत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे तीस हजार कोटी गेले कुठे याचा लेखाजोखा या मंडळींनी द्यावा - @nawabmalikncp@BJP4Maharashtra@ShivSena
— NCP (@NCPspeaks) October 3, 2019
मुंबई मनपाचे ३० हजार कोटी बजेट आहे तर त्याचा लेखाजोखा द्या. ज्यावेळी मुंबई तुंबली होती त्यावेळी खर्चात कमी केली का? मग मनपा आर्थिक संकटात कशी आली. मनपाचे ३० हजार कोटी कुठे गेले. मलनिसारण व्यवस्था, पाण्याची व्यवस्था चांगली नाही तरी करवसुली मनपाकडून केली जाते आहे. पाचशे फुटाच्या घरांना कर घेणार नाही असे जाहीर करण्यात आलेले असताना हा कर कमिशनर का घेत आहेत असा सवालही नवाब मलिक यांनी करतानाच भाजप- शिवसेना मनपाला लुटत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
नीरज गुंडे हा दररोज कमिशनरच्या घरी, मुख्यमंत्री यांच्या घरी का जात असतो? प्रसाद लाड यांनाच का ठेका दिला जातोय असा असा सवाल करतानाच मुंबईकरांवर कर वसुलीचा डाव भाजप - शिवसेना आखत असेल तर तो डाव हाणून पाडला जाईल असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.