‘नामकरण’ रंगी रंगले मुंबईचे नगरसेवक

By admin | Published: April 12, 2017 03:13 AM2017-04-12T03:13:23+5:302017-04-12T03:13:23+5:30

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एकीकडे हायटेक सेवा निर्माण करणारे महापालिका प्रशासन जनतेच्या तक्रारी सोडविण्याबाबत मात्र उदासीन आहे़ त्यामुळे चुटकी

Mumbai corporator of 'naming' | ‘नामकरण’ रंगी रंगले मुंबईचे नगरसेवक

‘नामकरण’ रंगी रंगले मुंबईचे नगरसेवक

Next

मुंबई : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एकीकडे हायटेक सेवा निर्माण करणारे महापालिका प्रशासन जनतेच्या तक्रारी सोडविण्याबाबत मात्र उदासीन आहे़ त्यामुळे चुटकीसरशी सोडविणे शक्य असलेल्या तक्रारींसाठीही किमान १६ दिवसांचा कालावधी लागत आहे़ त्याच वेळी मुंबईकरांनी निवडून दिलेले नगरसेवक मात्र रस्ते व चौकांच्या नामकरणाचे पाळणे हलविण्यात व्यस्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़ २०११ ते २०१६ या पाच वर्षांचा नगरसेवक व राजकीय पक्षांचे प्रगतिपुस्तक प्रजा फाउंडेशन या संस्थेने आज प्रकाशित केले़ या श्वेतपत्रिकेतून नगरसेवक व महापालिकेचा ढिसाळ कारभार पुढे आला आहे़ (प्रतिनिधी)

एका दिवसाने प्रगती़
नागरी समस्या सोडवण्यासाठी २०१४मध्ये सरासरी १७ दिवस लागले होते. वर्षभरात महापालिकेने यामध्ये प्रगती केली खरी़़ मात्र, एका दिवसाचीच २०१६मध्ये नागरी समस्या सोडविण्यासाठी सरासरी १६ दिवस लागले आहेत़ तर मृत जनावर उचलण्यासाठी सरासरी १२ दिवस, सार्वजनिक शौचालय स्वच्छ होत नसल्याची तक्रार सोडवण्यासाठी सरासरी तब्बल २० दिवस लागले. दूषित पाणीपुरवठा थांबवण्यासाठीही सरासरी १७ दिवस लागल्याची माहिती प्रजा फाउंडेशनने दिली आहे.

तक्रारींसाठी व्यासपीठ नाही...
गेल्या वर्षभरात महापालिकेकडे ८१ हजार तक्रारी आल्या. त्यातील १३ हजार तक्रारी रस्त्यांविषयी, तर १६ हजार तक्रारी इमारतीसंबंधी होत्या. याशिवाय रस्ते, पदपथ, उद्यानातील समस्यांविषयी सुमारे दोन हजार तक्रारी आल्या. २०१२च्या तुलनेत तक्रारींमध्ये घट झाली आहे़, परंतु तक्रारी दाखल करण्यासाठी पालिकेने योग्य व्यासपीठ पुरवलेले नाही. त्यामुळे अनेक रहिवाशांच्या तक्रारी असूनही त्यांना त्या पालिकेकडे दाखल करता येत नाहीत, असे प्रजा फाउंडेशनचे विश्वस्त निताई मेहता म्हणाले.

वचननाम्याची परीक्षा़
आपल्या अहवालात प्रजाने विविध राजकीय पक्षांकडून वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची त्याच्या नगरसेवकांनी मागील पाच वर्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांबरोबर तुलना केलेली आहे. निवडणुकांपूर्वी आपल्या वचननाम्यात नमूद केलेल्या मुद्द्यांविषयी काही प्रश्न राजकीय पक्षांनी विचारणे हे अपेक्षितच असते. हे पक्ष आपल्या मतदारांशी कितपत प्रामाणिक आहेत, याचा अंदाज येतो, याची परीक्षा प्रजाने घेतली़

असे आहेत निकाल़
निवडणुकीच्या प्रचारात रस्त्यांचे भांडवल करणाऱ्या भाजपाने प्रत्यक्षात वर्षभरात खड्ड्यांविषयी केवळ १८ प्रश्न विचारले. त्याचप्रमाणे, रस्ते निविदेसंबंधी या शीर्षकाखाली शिवसेनेने
फक्त तीन प्रश्न विचारले. त्यामुळे राजकीय पक्ष निवडणूक प्रचार काळात आणि वचननाम्यात या मुद्द्यांवर विशेष भर देताना दिसतात.
मात्र, निवडणुका झाल्यानंतर त्यांना त्या मुद्द्यांविषयी फारशी कळकळ नसते, तसेच राजकीय पक्ष जे दावे करतात, त्याबद्दल ते कितपत गंभीर असतात, हे या माहितीच्या आधारे तपासण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.

मौनीबाबा पुन्हा आले निवडून
नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करताना, आणखी रोचक निरीक्षण प्रजाच्या लक्षात आले. मार्च २०१२ आणि डिसेंबर २०१६ दरम्यान पालिकेच्या बैठकांमध्ये ८८ नगरसेवकांनी वर्षाला पाच किंवा त्यापेक्षा कमी प्रश्न विचारले. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये असे १५ नगरसेवक पुन्हा निवडूनही आले.

- नागरी समस्या एकीकडे वाढत असताना, लोकप्रतिनिधींना रस्त्यांची व चौकांची नावे बदलण्यात स्वारस्य असल्याचे गेल्या पाच वर्षांत दिसून आले. गेल्या पाच वर्षांत प्रभाग समित्यांमध्ये सर्व नगरसेवकांनी एकूण ५,७४२ प्रश्नांपैकी रस्त्यांच्या नामकरणाबाबत ९३३ प्रश्न विचारले़ ८७९ प्रश्न हे रस्त्यांसंबंधी होते. आरोग्य व शिक्षण या महत्त्वाच्या विषयांसंबंधी अनुक्रमे १२५ व १११ प्रश्न विचारले गेले.

- मार्च २०१२ ते डिसेंबर २०१६ दरम्यान नगरसेवकांनी विचारलेल्या दर सहा प्रश्नांपैकी साधारण एक प्रश्न हा रस्ते आणि चौकांना नाव देण्याबद्दल किंवा नावात बदल करण्याविषयीचा होता. २०१६मध्ये उपस्थित केलेल्या कार्यक्रमपत्रिका(पत्र)चा आयुधा अंतर्गत ३५१ प्रश्नांपैकी २६३ प्रश्न हे रस्ते किंवा चौकांना नाव देण्याविषयी किंवा नावात बदल करण्याविषयीचे होते़

Web Title: Mumbai corporator of 'naming'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.