न्यायाधीश असल्याचे भासवत जिल्हा न्यायाधीशाला ५० हजारांचा गंडा; सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल
By मनोज गडनीस | Published: May 25, 2024 08:15 PM2024-05-25T20:15:02+5:302024-05-25T20:18:13+5:30
उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगून एका भामट्याने जिल्हा न्यायाधीशाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबई : आपण मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असून ५० हजार रुपयांची तातडीची गरज असल्याचा व्हॉट्सॲप मेसेज सोलापूर जिल्हा न्यायाधीशाला पाठवत त्यांना गंडा घालणाऱ्या सायबर भामट्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या भामट्याचा पोलिस शोध घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, सोलापुर जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाला मुंबई उच्च न्यायालयातील एका न्यायाधीशाचा फोटो असलेला मेसेज व्हॉट्सॲपवर आला आणि त्यात ५० हजारांची तातडीची गरज असल्याचे त्याने सांगितले. संबंधित जिल्हा न्यायाधीशाने यावर विश्वास ठेवत तातडीने त्या क्रमांकावर ५० हजार रुपये पाठवले.
मात्र, त्यानंतर काही वेळाने त्याच क्रमांकावरून आणखी पैशांची मागणी आल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांना संशय आला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातील रजिस्टार कार्यालयात फोन करून या संदर्भात विचारणा केली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी कोणत्याही प्रकारे पैसे मागितले नसल्याचे त्याला समजले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे जिल्हा न्यायाधीशाच्या लक्षात आले. या फसवणुकीनंतर मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.