Mumbai Crime : मुंबईत एका व्यावसायिकाला भरदिवसाा २५ लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. व्यावसायिकाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणात दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या गुन्ह्यासाठी खंडणीकोरांच्या सहा जणांच्या टोळीने पोलीस वाहनाचा वापर केला होता. या प्रकरणामुळे पोलीस दलात देखील खळबळ उडाली आहे.
माटुग्यांच्या प्रसिद्ध कॅफे म्हैसूरच्या मालकासोबत हा सगळा प्रकार घडला. हॉटेल व्यावसायिक नरेश नायक यांच्या घरी जात सहा जणांच्या टोळीने त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळली. आपण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगते सहा जणांची टोळी नरेश नायक यांच्या सायन येथील घरात घुसली होती. त्यानंतर खाकीचा धाक दाखवत आरोपींनी त्याच्या घरातील २५ लाखांची रोकड घेऊन पळ काढला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर नायक यांच्या त्यांच्या एका पोलीस असलेल्या मित्राला हा सगळा प्रकार सांगितला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर नायक यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी सायन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.
पोलिसांनी तपास करुन याप्रकरणी बाबासाहेब भागवत (५०), दिनकर साळवे (६०),वसंत नाईक (५२), शाम गायकवाड (५२),नीरज खंडागळे (३५) आणि सागर रेडेकर या आरोपींना अटक केली. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीत आणखी काही सेवानिवृत्त पोलिसांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बाबासाहेब भागवत आणि दिनकर साळवे हे दोघेही मुंबई पोलिस दलात मोटार वाहन विभागात पोलीस चालक म्हणून कार्यरत होते. आरोपी साळवे हा सेवानिवृत्त असून बाबासाहेब भागवत हा एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहे.
या टोळीतील वसंत नाईक हा कॅफे म्हैसूरमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. वर्षभरापूर्वी वसंतला कामावरून काढून टाकल्याने त्याने नरेश नायक यांना लुटण्याचा योजना आखली. कारण वसंतला नायक यांच्या घरी मोठी रक्कम ठेवलेली असते हे माहिती होते. त्यामुळे यासाठी सागर रेडेकरला हाताशी घेतले आणि लुटण्याची योजना आखली. सागरने यामध्ये शाम गायकवाडला सोबत घेतले. त्यानंतर शामने त्याच्या संपर्कात असलेले मोटार वाहन विभागातील पोलीस चालक भागवत आणि दिनकर साळवे यांनाही योजनेत सहभागी करुन घेतली.
सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एक पोलीस व्हॅन आणि एक खाजगी वाहनातून आरोपी नायक यांच्या घरी पोहोचले. आरोपींनी पोलिसांचे ओळखपत्र दाखवून आम्ही गुन्हे शाखेचे अधिकारी आहोत असे नायक यांना सांगितले. तुमच्या घरात निवडणुकीत वाटण्यासाठीची रोकड ठेवली असल्याची माहिती आम्हाला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दोघांनी घराची झाडाझडती घेतली आणि कपाटून २५ लाख रुपये बाहेर काढले. आरोपींनी नायक यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत घाबरवलं. त्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी नायक यांच्याकडे २ कोटींची खंडणी मागितली. नायक यांनी माझ्याकडे एवढी रक्कम नसल्याचे सांगताच आरोपींनी २५ लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला.
त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नायक यांनी सायन पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही तपासले असता यामध्ये पोलीस वाहनांचा वापर झाल्याचे समोर आलं. पोलिसांनी अधिक तपास करुन मंगळवारी रात्री दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. यानंतर बुधवारी इतर चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.