मीरा रोड : बोलणे बंद केले म्हणून एका तरुणाने परिचित अभिनेत्रीला तिच्या इमारतीत गाठून धमकी देत गालावर वार करून जखमी केल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली आहे. फिर्यादीनंतर काशिगाव पोलिस ठाण्यात शर्माविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मीरा रोडच्या गौरव एक्सलन्सीमध्ये साक्षी नीरज कपूर ही अभिनेत्री राहते. तिची रोहित कीर्ती शर्मा (२८, रा. राजेश एन्क्लेव्ह, साईबाबानगर, मीरा रोड) याच्याशी ४ ते ५ वर्षांपासून ओळख आहे.
साक्षीच्या फिर्यादीनुसार ती त्याचे कॉल घेत नव्हती. १७ नोव्हेंबरच्या सायंकाळपासून त्याने तिला व तिच्या आईला कॉल केले. आईकडे तिच्याबद्दल विचारणा केली असता साक्षी थोड्याच वेळात घरी येईल, असे शर्मा याला समजले.
साक्षी अंधेरी येथून कामावरून रात्री परतत असताना इमारतीच्या बाहेर ती रिक्षातून उतरताच शर्माने तिला गाठले. तू माझ्याशी बोलत नाहीस, असे बोलत तिच्याशी वाद घातला.
शर्मा याने तिच्या दिशेने हात उचलला असता तिने हात झटकला. त्यावेळी त्याच्या हातातील शस्त्राने तिच्या गालावर वार केल्याने तिला जखम झाली. ‘तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुझी जिंदगी खराब करून टाकेन,’ असे धमकावत तिला शिवीगाळ केली.