कर्मचाऱ्याकडून टाइम्स आॅफ इंडियाला साडेपंधरा कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:36 AM2018-05-10T05:36:10+5:302018-05-10T05:36:10+5:30

टाइम्स आॅफ इंडियाच्या डोमेनवर बनावट नावाने खाते उघडून, लेख आणि साहित्य प्रकाशित केल्याचे भासवत, टाइम्स आॅफ इंडियाच्याच सचिवाने तब्बल १५ कोटी ७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.

mumbai Crime news | कर्मचाऱ्याकडून टाइम्स आॅफ इंडियाला साडेपंधरा कोटींचा गंडा

कर्मचाऱ्याकडून टाइम्स आॅफ इंडियाला साडेपंधरा कोटींचा गंडा

Next

मुंबई  - टाइम्स आॅफ इंडियाच्या डोमेनवर बनावट नावाने खाते उघडून, लेख आणि साहित्य प्रकाशित केल्याचे भासवत, टाइम्स आॅफ इंडियाच्याच सचिवाने तब्बल १५ कोटी ७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात सचिव अमित मयेकरसह अन्य साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या सीआययूने १८ जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मयेकर हा सध्या पसार असून, त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१३ पासून मयेकरने टाइम्स आॅफ इंडियाच्या डोमेनवर बनावट नावाने खाते उघडले. लेख आणि साहित्य प्रकाशित केल्याचे भासवत काही मित्रांना त्याने हाताशी धरले. २०१३ पासून त्याने तब्बल ७८ जणांच्या खात्यांवर पैसे पाठविले. मात्र, या ७८ जणांकडून कुठल्याच स्वरूपाचे लेख मिळाले नसल्याचे समोर येताच हा प्रकार उघडकीस आला. यात मयेकरने २०१३ ते आतापर्यंत १५ कोटी ७ लाख १६ हजार ३२० रुपयांची फसवणूक केली आहे.
त्याने टाइम्स आॅफ इंडियाचे सहायक कार्यकारी संपादक डेरीक डिसा यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, हे पैसे खात्यात वळते केले. डिसा यांच्या सहीने अंशकालीन वार्ताहरांचे पगार निघायचे. मयेकर जुना कर्मचारी असल्याने डिसा यांना त्याच्यावर संशय आला नाही. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर डिसा यांच्याच तक्रारीवरून २ मे रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अमित मयेकर आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. आयुक्तांच्या आदेशाने या प्रकरणी सीआययूकडून अधिक तपास सुरू आहे. सीआययूने सोमवारी या प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली. यात नामांकित वर्तमानपत्रातील वरिष्ठ पत्रकारांचा समावेश आहे.

Web Title: mumbai Crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.