नोकरीचे आमिष दाखवून पती - पत्नीने घातला लाखोंचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 08:29 PM2018-06-28T20:29:26+5:302018-06-28T20:29:50+5:30
ऑल इंडिया फिजीकल रिहॅबिलेशन सेंटर हाजी अली या ताडदेव येथील रुग्णालयात नोकरीस लावतो म्हणून बतावणी करून पती - पत्नीने घातला लाखोंचा गंडा
मुंबई - ऑल इंडिया फिजीकल रिहॅबिलेशन सेंटर हाजी अली या ताडदेव येथील रुग्णालयात नोकरीस लावतो म्हणून बतावणी करून अदिती सुभेदार आणि अशोक सुभेदार या पती पत्नींनी राजेंद्र बोडखे (वय ४८) यांना ५ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत धारावी पोलीस ठाण्यात सुभेदार दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी संतोष येवले याप्रकरणी चौकशी करत आहेत.
राजेंद्र बोडखे हे धारावीत राहत असून आरोपी सुभेदार दाम्पत्य हे अँटॉप हिल येथे राहत होते. मात्र, सध्या ते राहत नसून त्यांचा ठावठिकाणा नाही. डिसेंबर २०१६ ते मार्च २०१८ दरम्यान बोडखे यांनी सुभेदार दाम्पत्याला थोडी - थोडी रक्कम मुलाला रुग्णालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने दिली. दिलेली रक्कम हि ५ लाख ३० हजार रुपये इतकी असून अनेक दिवस उलटून गेले तरी बोडखे यांच्या मुलाला नोकरी मिळाली नाही. तसेच सुभेदार पती - पत्नी यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने बोडखे यांनी धारावी पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अदिती सुभेदार या ऑल इंडिया फिजीकल रिहॅबिलेशन सेंटर हाजी अली येथे सहाय्यक अधिकारी म्हणून काम करत होत्या. नंतर त्या निवृत्त झाल्या. पोलीस संबंधित रुग्णालयातून अदिती सुभेदार यांची चौकशी करत असून डोंगरी येथील त्यांच्या नातेवाईकांकडे देखील पोलिसांनी चौकशी केली. मात्र पोलिसांना अद्याप या ठग दाम्पत्याचा शोध लागलेला नाही. पोलिसांचे तपास कार्य सुरु आहे. धारावी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.