Join us

खोदकाम करून सहा लाखाची केबल चोरी; अनधिकृत खोदकामे आढळल्यास पोलिसात तक्रार दाखल करा

By जयंत होवाळ | Published: June 12, 2024 7:52 PM

पावसाळा सुरू झाल्याने स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी सदर पदपथ पूर्ववत केला जात आहे.

मुंबई : माटुंगा भागात पदपथ खोदून चोरट्याने एमटीएनएलची सहा लाख किमतीची तांब्याची केबल चोरी करण्याचा पराक्रम केल्याचे उघडकीस आले आहे.त्यामुळेअनधिकृत खोदकाम होत असल्यास थेट पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश मुंबई महापालिका प्रशासनाने विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

माटुंगा (पूर्व) परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथ खोदून अज्ञातांनी केबल चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. याबाबत महानगरपालिकेने  पोलिसांत तक्रार केली तर, महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने (एमटीएनएल)  माटुंगा पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल केला आहे. या अनधिकृत खोदकामातून  महानगरपालिका आणि एमटीएनएलच्या   मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान पावसाळा सुरू झाल्याने स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी सदर पदपथ पूर्ववत केला जात आहे.

खोदकामाची  पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. आपापल्या विभागात अशा प्रकारे कुठे अनधिकृत खोदकाम केल्याचे आढळून आल्यास त्वरित पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश प्रशासनाने सर्व विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्तांना दिले आहेत. तसेच अन्य  प्राधिकरणांनाही  कळविले आहे.

दादर, माटुंगा परिसरात एमटीएनएलने  पदपथाखालून केबल  टाकली आहे. एमटीएनएलकडे ग्राहकांच्या दूरध्वनी सेवा खंडित झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ लागल्या तेव्हा शोध घेतला असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील बस थांब्याजवळ अज्ञातांनी पदपथ खोदून १०३ मीटर लांबीची केबल चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. या वाहिनीतील ६ लाख ७८ हजार रुपयांचे तांबे अज्ञातांनी चोरून नेले आहे. याबाबत एमटीएनएलने माटुंगा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस