लिफ्ट दिलेल्या अनोळखी मुलीसोबत केली कबाबपार्टी, मोबाईल,बाईक घेऊन ती झाली कलटी!
By गौरी टेंबकर | Published: December 23, 2023 02:56 PM2023-12-23T14:56:59+5:302023-12-23T14:57:20+5:30
Mumbai Crime News: रस्त्यात अनोळखी तरुणीला लिफ्ट देणे आणि त्यानंतर तिच्यासोबत कबाब खायला जाणे एका ३३ वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. या महिलेने तिच्या बुरखाधारी साथीदाराच्या मदतीने त्यांचा मोबाईल आणि मोटरसायकल पळवून नेली.
- गौरी टेंबकर
मुंबई - रस्त्यात अनोळखी तरुणीला लिफ्ट देणे आणि त्यानंतर तिच्यासोबत कबाब खायला जाणे एका ३३ वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. या महिलेने तिच्या बुरखाधारी साथीदाराच्या मदतीने त्यांचा मोबाईल आणि मोटरसायकल पळवून नेली. याप्रकरणी वांद्रे पोलिसात दोघाविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार फैयाज हुसेन (३३) हे धारावीचे राहणारे असून दोन महिन्यापूर्वी गोवंडीला जाताना वांद्रे कोर्ट परिसरात शाहीन नाव सांगणाऱ्या मुलीने हाताने इशारा करून त्यांना थांबवत कुर्लापर्यंत लिफ्ट मागितली. तसेच या दरम्यान या दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांकही शेअर केले. दोन दिवसानंतर तिने हुसेनना फोन केला आणि त्यांना वांद्रे तलाव परिसरात भेटली. शाहीनने १८ डिसेंबरला हुसेनला रात्री तीन वेळा फोन करत दुसऱ्या दिवशी वांद्रे तलाव परिसरात पुन्हा भेटायला सांगितले. दुसऱ्या दिवशी हुसेन तलावाजवळ गेल्यावर शाहीन ही बुरख्यामध्ये असलेल्या अजून एका महिलेसह त्या ठिकाणी आली. ते तिघे हुसेनच्या मोटरसायकल वरून रात्री साडे बारा वाजता एका कबाब कॉर्नरकडे गेले. बोलता बोलता शाहीन ने हुसेन चा मोबाईल आणि मोटरसायकलची चावी स्वतःकडे घेत त्याला कबाब आणायला पाठवले. त्यानंतर हुसेनच्या दुचाकीवर बुरखाधारी महिला आणि शाहीन बसले. आम्ही मेडिकलमध्ये जाऊन येतो असे त्यांनी हुसेनला सांगितले आणि त्या तिथून पसार झाल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हुसेनने वांद्रे पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.
सुहनाने मोबाईल पळवला...
पॉलिसी विकणाऱ्या कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरला २६ ऑक्टोबर रोजी बांगुरनगर पोलिसांच्या हद्दीत अशाच प्रकारे बुरखाधारी महिला साथीदाराच्या मदतीने सुहाना नामक तरुणीने गंडा घातला होता. इंस्टाग्रामवर झालेल्या मैत्रीनंतर त्याला एका मॉलजवळ भेटायला बोलावत त्यांचा मोबाईल पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.