विवाहित असून ७ महिलांशी लग्न, तिघांवर अत्याचार; आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:24 PM2024-05-08T15:24:25+5:302024-05-08T15:24:43+5:30

अविवाहीत महिलांची मॅट्रिमोनिअल साईटवरुन फसवणूक करणाऱ्या हैदराबादच्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Crime News Imran Ali Khan cheated 20 women on matrimonial site | विवाहित असून ७ महिलांशी लग्न, तिघांवर अत्याचार; आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विवाहित असून ७ महिलांशी लग्न, तिघांवर अत्याचार; आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai Crime : मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करणाऱ्या इमरान अली खान नावाच्या व्यक्तीला मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. इमरान अलीने पायधुनी परिसरातील एका ४२ वर्षीय महिलेची २२ लाखांची फसवणूक केली होती. मुंबई पोलिसांत इम्रान खानविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईसह परभणी, धुळे आणि सोलापूर येथील १० ते १२ महिलांसह इम्रानने देशभरातील २० हून अधिक महिलांना लक्ष्य केल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आता इम्रान खानबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

वाढत्या वयामुळे लग्न करता येत नसलेल्या मुंबईच्या पीडित महिलेला इम्रान खानने लक्ष्य केलं होतं. लग्न करण्याचे वचन देऊन इम्राम खानने मुंबईतील भायखळा येथे फ्लॅट विकत घेण्यासह वेगवेगळ्या बहाण्याने तिच्याकडून अनेक वेळा पैसे घेतले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने इम्रान खानविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी इम्नान खान याला हैदराबाद येथून अटक केली. न्यायालयापुढे हजर केल्यानंतर खान याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही शिक्षक म्हणून काम करते. २०२३ मध्ये पीडित महिलेने मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर स्वतःची प्रोफाईल तयार केली होती. त्यानुसार तिला काही सूचना मिळाल्या होत्या. यामध्ये इम्रान खान नावाच्या व्यक्तीचा देखील समावेश होता. महिलेने जेव्हा इम्रानसोबत संपर्क साधला तेव्हा त्याने बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगितले. आई वडील हैदराबाद येथे असून काकांसोबत राहत असल्याचे त्याने महिलेला सांगितले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना पसंत केले. अचानक एकेदिवशी इम्रान खानने महिलेला फोन करुन १ हजार रुपये मागितले. त्यानंतर महिलेने इम्रानला मुंबईला बोलवले.

मुंबईत येण्यासाठी इमरानने महिलेकडून 10 हजार रुपयेही घेतले. काही दिवस तो मुंबईत राहिला आणि त्यानंतर त्याने भायखळा येथे प्लॉट खरेदीच्या नावाखाली महिलेकडून 15 लाख रुपये घेतले. यानंतर इम्रानने महिलेला सांगितले की, आपण खरेदी केलेली जमीन वनविभागाची आहे, त्यासाठी पोलिसांनी मला अटक केली आहे. असं सांगून इम्रान खानने पुन्हा महिलेकडून पैसे घेतले आणि एकूण
२१.७३ लाख रुपयांची फसवणूक केली.

"इम्रानकडे चौकशी केली असता तो विवाहित असूनही त्याने किमान सात महिलांशी फसवणुकीच्या उद्देशाने लग्न केल्याचे निष्पन्न झालं आहे. यामध्ये सोलापूर, परभणी, पश्चिम बंगालमधील महिलांचा समावेश आहे. मुस्लीम समाजातील घटस्फोटित महिलांचा तो शोध घ्यायचा. स्वतःची व्यवसायिक म्हणून ओळख करून तो त्यांच्याशी मैत्री करायचा. त्यांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये बोलवायचा आणि त्यांचा पूर्ण विश्वास जिंकल्यानंतर त्यांच्याकडून पैसे काढायला सुरुवात करायचा. इम्रान फसवणुकीचा पैसा जुगार खेळण्यासाठी वापरणार होता," असे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Mumbai Crime News Imran Ali Khan cheated 20 women on matrimonial site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.