मुंबईत शस्त्रांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक
By मनीषा म्हात्रे | Published: July 3, 2024 07:11 PM2024-07-03T19:11:22+5:302024-07-03T19:11:51+5:30
Mumbai Crime News: आंतरराज्यीय स्तरावर बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करणाऱ्या त्रिकुटाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्रिकूटाकडून ८ आधुनिक पिस्तूल व १३८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.
मुंबई - आंतरराज्यीय स्तरावर बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करणाऱ्या त्रिकुटाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्रिकूटाकडून ८ आधुनिक पिस्तूल व १३८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. एम. गुलाब चौधरी (५३, उत्तरप्रदेश ), दवल चंद्रपा देवरामनी उर्फ धवल उर्फ अनिल (३४, नवी मुंबई ), पुष्पक जगदीश माडवी (३८, नवी मुंबई ) अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटांची नावे आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही जण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने जुहू येथील म्हाडा कॉलनी परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे स्टेनलेस स्टीलचे पिस्टलआणि ७ जिवंत काडतुसे मिळून आले. चौकशीत त्याच्याकडे पिस्तूल परवाना नसल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरु केला. चौकशीत आणखीन पाच पिस्तूल आणि १२१ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. तसेच अन्य दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींकडून कडून देखील दोन पिस्तूल आणि १० जिवंत जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत तीनही आरोपींकडून एकूण ८ पिस्तूल व १३८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असून या गुन्हयाचा तपास कक्ष ९ कडून करण्यात येत आहे.तिन्ही आरोपीना ८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आतापर्यंतच्या चौकशीत उत्तरप्रदेशच्या मिरझापूरचा रहिवाशी असलेला चौधरी हा २०१० पासून राज्यातील विविध भागातून शस्त्रे आणून त्याची मुंबईसह विविध भागात विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध उत्तरप्रदेशमध्ये चार गुन्हे नोंद आहे. तर, पुष्पक आणि धवल हे देखील रेकॉर्डवरील आरोपी आहेत. या आरोपींची आतापर्यंत किती जणांना शस्त्रांची विक्री केली? या शस्त्रांचा कुठल्या गुन्हयात वापर झाला आहे का? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.