Join us

नाश्ता तयार नाहीये म्हणताच संतापला पती; हातोडी, स्क्रू ड्रायव्हरने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:56 AM

मुंबईतल्या कुर्ला परिसरात पतीने क्षुल्लक कारणावरुन पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे

Mumbai Crime : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या एका धक्कादायक घटनेत, मुंबईतील कुर्ला परिसरात महिलेला तिच्या पतीने क्रूरपणे मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरुन पतीने केलेल्या बेदम मारहाणीची चर्चा आसपासच्या परिसरात सुरु आहे.

पत्नीने वेळेवर नाश्ता बनवला नाही म्हणून पतीने तिच्या डोक्यात हातोडा मारल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला परिसरात घडला आहे. आरोपीने एवढ्यावरच न थांबता चाकू आणि स्कू ड्रायवरनेही पत्नीवर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ३४ वर्षीय पत्नीला कुर्ल्यातील भा.भा. रुगणालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

गुडिया मोहम्मद फय्युम खान (३४) असे जखमी महिलेचे नाव आहे. तर  फय्युम जहीर खान (३८) असे पतीचे नाव आहे. गुडिया कुर्ला पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या गणेश बाग लेन येथे फय्युमसोबत राहत होत्या. गुरुवारी सकाळी वेळेवर नाश्ता बनवला नसल्यामुळे फय्युमने गुडियासोबत वाद घातला. त्यानंतर संतापाच्या भरात फय्युमने हातोडा उचलून गुडियाच्या डोक्यात मारला. एवढ्यावरच न थांबता त्यांने चाकूने गुडियाच्या गळ्यावर तीन वार केले. त्यानंतर स्क्रू डायवरने गुडीच्या डोक्यावर हल्ला केला. त्यामुळे गुडियाला गंभीर दुखापत झाली.

शेजाऱ्यांनी गुडियाचा आवाज ऐकून घरात धाव घेतली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यानंतर फय्युमने स्वतःच गुडियाला कुर्ला गार्डनमधील जवळच्या क्लिनिकमध्ये नेले. मात्र जखमा पाहून डॉक्टरांनी तिला भा.भा. रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. गुडियाला जवळच्या भा.भा. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी कुर्ला पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. कुर्ला पोलिसांनी मोहम्मद फय्युम खान याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. गुडियाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीसघरगुती हिंसा