सलमान खानचा बर्थडे ... फॅन्सचे मोबाईल लंपास
By गौरी टेंबकर | Updated: December 29, 2023 14:54 IST2023-12-29T14:53:53+5:302023-12-29T14:54:35+5:30
Mumbai Crime News: भाईजान उर्फ सलमान खान याच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या फॅन्सना चांगलाच फटका पडला आहे. लाडक्या अभिनेत्याला चिअर करताना मोबाईल गमवावे लागले. याप्रकरणी त्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेतल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान खानचा बर्थडे ... फॅन्सचे मोबाईल लंपास
- गौरी टेंबकर
भाईजान उर्फ सलमान खान याच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या फॅन्सना चांगलाच फटका पडला आहे. लाडक्या अभिनेत्याला चिअर करताना मोबाईल गमवावे लागले. याप्रकरणी त्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेतल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआर नुसार, २७ डिसेंबर रोजी सलमान वाढदिवस असल्याने त्याच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वांद्रे पश्चिम परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंट या त्याच्या निवासस्थानासमोर असलेल्या बी जी रोडवर झाली होती. त्यावेळी समसुल शेख (२४) हा फार्मसीमध्ये डिप्लोमा करणारा विद्यार्थी देखील त्या ठिकाणी आला होता. शेखच्या म्हणण्यानुसार सलमान चहात्यांना त्याची झलक दाखवण्यासाठी बाहेर आला तसे सर्व फॅन्सनी गर्दी केली.
याच गर्दीचा फायदा घेत त्याचा मोबाईल कोणीतरी लंपास केला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आधी त्याचा मोबाईल शोधला. मात्र तो त्याला न मिळाल्याने अखेर या विरोधात त्याने वांद्रे पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान प्रगती तिवारी (२५) नामक महिला तिच्या पती सोबत सदर ठिकाणी भेटायला आली होती त्यावेळी तिला देखील तिचा फोन या गर्दीमुळे गमवावा लागला असून तिनेही पोलिसात धाव घेतली आहे.