Join us

इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:16 AM

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून तब्बल ५५ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड केले आहे.

Mumbai Crime :मुंबई पोलीस गेल्या काही वर्षांपासून प्रगत तंत्रज्ञानासोबत काम करुन गुन्ह्यांची उकल करताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनाही अशात एका गुन्ह्याची उकल चक्क इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून केली आहे. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी ५५ लाख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन बहि‍णींना अटक केली. एका वृद्ध जोडप्याच्या घरी या दोन्ही बहिणी काम करत होत्या. त्याचवेळी तब्बल ५५ लाख रुपयांची चोरी दोघींनी केली. मात्र एका चुकीमुळे त्या पोलिसांच्या तावडीत सापडल्या.

काळाचौकी परिसरात हा सगळा प्रकार घडला. दोन्ही बहिणी एका वृद्ध जोडप्याच्या घरी काम करत होत्या. दोघांनी या वृद्ध जोडप्याच्या घरातून तब्बल ५५ लाख रुपये किमतीचे दागिने, महागडे कपडे आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या. त्यानंतर हेच महागडे कपडे आणि दागिने घालून दोघी बहिणींनी रील्स तयार करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्या होत्या. या संदर्भात वृद्ध दाम्पत्याने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याच रील्सच्या माध्यमातून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

काळाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोन्ही बहि‍णींना अटक करण्यात आली आहे. छाया वेतकोळी (२४) आणि भारती वेतकोळी (२१) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोघांनी चोरीचे दागिने आणि कपडे घालून रील्स तयार केल्या आणि त्या इन्स्टाग्रामवर अपलोड केल्या. वृद्ध दाम्पत्याने त्याआधी घरातून दागिने, कपडे आणि रोख रक्कमेसह विदेशी चलन गायब झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.

पोलिसांनी तक्रार मिळताच वृद्ध दाम्पत्याचे जबाब नोंदवले. वृद्ध जोडप्याने सांगितले की,त्यांच्या घरी दोन बहिणी काम करत होत्या. दोन्ही बहिणींनी सोन्याचे दागिने आणि महागडे कपडे घालून अनेकदा रील अपलोड केल्याचे आम्ही पाहिले. पोलिसांनी पुन्हा वृद्ध दाम्पत्याकडे रील्समधील दागिने त्यांचेच आहेत का याबाबत चौकशी करुन खात्री करुन घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बहि‍णींचा शोध सुरु केला.

पोलिसांच्या पथकाने दोन्ही बहिणींचे लोकेशन ट्रेस केले असता त्या रायगडमध्ये सापडल्या. दोन दिवसांपूर्वी दोन्ही आरोपी बहिणींना रायगड जिल्ह्यातून पकडण्यात आले आणि त्यांच्या ताब्यातून ५५ लाख रुपयांची मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही बहिणींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८१ आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बहिणींची चौकशी सुरू असून पुढील तपासानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसगुन्हेगारीइन्स्टाग्राम