मुंबई - तुमच्या नावाने एक कुरिअर आले असून, त्यात अमली पदार्थ आढळले आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यात तुमच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. थोड्या वेळात तुम्हाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) तुमची चौकशी करण्यात येईल, असा फोन मुंबईतील सुश्मिता एस. (नाव बदलले आहे) या तरुणीला शनिवारी आला. त्यानंतर सायबर भामट्याने स्वतः एनसीबीचा अधिकारी असल्याचे सांगत तिची फोनवरून चौकशी करताना तुम्ही मनी लॉड्रिंग प्रकरणातही गुंतल्याची भीती दाखवली व बँक खात्याचा तपशील मागितला. त्यामुळे ती सावध झाली. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने पोलिस ठाण्यात याविरोधात तक्रार दिली.
सुश्मिता यांना शनिवारी सकाळी प्रदीप सावंत या नावाने एनसीबीचा अधिकारी असल्याचे सांगत फोन आला. मी तुमची ऑनलाइन चौकशी करणार आहे. त्यामुळे तुम्ही स्काईपवर लॉगइन करून माझ्याशी बोला, असे सांगितले. यामुळे भांबावलेल्या सुश्मिता यांनी स्काइपवर लॉग इन केले. सावंत याने त्या पार्सलमधील अमली पदार्थांच्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर तुमच्या नावाने एका राजकीय व्यक्तीने परदेशात ३०० कंपन्या सुरू केल्याचे सांगत त्याद्वारे शेकडो कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत.
यात तुमच्या आधार कार्डाचा वापर झाला असून, त्याची पडताळणी करायची असल्याने त्यांचा फोटो पाठवण्यास सांगितले. त्यानुसार सुश्मिता यांनी त्याला आधार कार्डाचा फोटो पाठवला हाेता.
आता तुम्ही या प्रकरणात संशयित आरोपी झाला असून, मला तुमच्या बँक खात्याचे तपशील द्या. मला त्यात कमिशन आले की नाही हे तपासायचे आहे. मात्र, ज्या क्षणी बँक खात्याचा तपशील मागण्यात आला, त्यावेळी सुश्मिता यांना यामध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचे वाटले आणि त्यांनी त्या तोतया अधिकाऱ्याची उलट तपासणी घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या तोतया अधिकाऱ्याने तो स्काइप कॉल कट केला. तसेच, स्काइपवर त्याने स्वतःचे गणवेशातील ओळखपत्र आणि आणखी काही फॉर्म पाठवले होते, तेही त्याने डिलिट केले.
तुमच्या आधार कार्डाचा वापर करून कोट्यवधी रुपये पाठवले गेल्याचे सुश्मिता यांना सांगितले आणि खात्यात कमिशन आले आहे का, अशी विचारणा केली. या घटनेनंतर सुश्मिता हिने पोलिसांना या प्रकाराची लिखित माहिती दिली आहे. तसेच, आपल्याकडून आधार कार्डाचा फोटो दिला गेला असल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे.