Mumbai Crime :मुंबईत एका घरात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेह हे पती पत्नीची असल्याची माहिती समोर आली आहे. ६१ वर्षीय पतीचा मृतदेह हा लटकवलेल्या अवस्थेत तर त्यांची ५७ वर्षीय पत्नी त्यांच्या शेजारी मृतावस्थेत पडली होती. फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. पतीने स्वत:ला गळफास लावून घेतला, परंतु पत्नीचा मृत्यू कसा झाला हे माहित नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद सोनकर (६१) आणि अर्पिता सोनकर (५७) अशी मृतांची नावे आहेत. प्रमोद सोनकर हे रिअल इस्टेट एजंट होते. सोनकर हे त्यांच्या पत्नीसह कांदिवली येथे राहत होते. शेजारच्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना रात्री उशिरा त्यांच्या घरात दोघेही मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या घरामधून एक चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे ज्यात टोकाचं पाऊल उचलण्याचे कारण सांगितले आहे.
सोनकर या जोडप्याला मूलबाळ नव्हते आणि आमच्या तपासात असे समोर आले आहे की ते आर्थिक अडचणीत होते, ज्यामुळे हे सगळे घडले असावे," अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण राणे यांनी दिली. रविवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र फ्लॅटचा दरवाजा आतून बंद दिसला. अनेक प्रयत्न करूनही दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात शिरताच वास अधिकच तीव्र झाला. प्रमोद वासुदेव सोनकर हे सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने लटकलेले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांची पत्नी या मृतावस्थेत पडल्या होत्या.
दरम्यान,घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात सोनकर यांनी ते मानसिकदृष्ट्या खचल्याचा उल्लेख केला असून ते स्वत:च्या इच्छेने हे पाऊल उचलत असून त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असं म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.