Mumbai Crime : मुंबईतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याला चोरट्यांनी विषारी इंजेक्शन दिल्याने मृत्यू झालाय. मुंबई पोलिसांच्या वरळी लोकल आर्म्स डिव्हिजन-3 मध्ये तैनात असलेल्या एका हवालदाराचा बुधवारी उपचारादरम्यान ठाण्याच्या एका रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस हवालदाराची जीवनाशी झुंज सुरु होती. चोरलेला मोबाईल परत मिळवण्याच्या नादात हवालदार चोरट्यांचा पाठलाग करत होता. मात्र चोरट्यांनी विषारी द्रव्याचे इंजेक्शन दिल्याने हवालदाराचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दादर रेल्वे पोलीस करत आहेत. विशाल पवार असे मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. विशाल पवार हे ठाण्यात राहत होते. रविवारी २८ एप्रिल रोजी विशाल पवार ठाण्याहून साध्या कपड्यांमध्ये कर्तव्यावर जात होते. रात्री 9.30 च्या सुमारास माटुंगा आणि सायन स्थानकांदरम्यान पवार ज्या गाडीत होते ती मंदावली. तितक्यात रेल्वे रुळांजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने पवार यांच्या हातावर फटका मारला. त्यावेळी विशाल पवार दरवाज्याजवळ फोनवर बोलत होते.
फटका मारल्याने विशाल पाटील यांच्या हातातील मोबाईल खाली पडला आणि तो चोरट्याने तो उचलला. लोकल स्लो असल्याने पवार यांनी खाली उतरून चोरट्याचा पाठलाग केला. काही अंतर चोरट्याच्या मागे पळाल्या नंतर विशाल पवार यांना चोरट्यांच्या टोळीनं घेरलं.पवार यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यानंतर इतरांनी पवार यांना पकडून ठेवलं आणि त्यातील एकाने त्यांच्या पाठीवर विषारी इंजेक्शन टोचले. तसेच त्यांनी विशाल पवार यांच्या तोंडात लाल रंगाचे द्रव्य ओतले. त्यानंतर पवार हे बेशुद्ध होऊन खाली कोसळले.
दुसऱ्या दिवशी विशाल पवार यांना शुद्ध आली. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडू लागली. त्यामुळे कुटुंबियांनी विशाल पवार यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात उपचारादरम्यान पवार यांची प्रकृती आणखीनच बिघडत गेली. बुधवारी अखेर विशाल पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पोलिसांनी रुग्णालयात त्यांचा जबाब नोंदवला होता. यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध आणि अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण आता रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
दरम्यान, ३० वर्षीय पवार हे २०१५ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई-वडील असून ते जळगाव येथे राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांना मूलबाळ नव्हते. त्याची पत्नी गेल्या आठ दिवसांपासून नाशिक येथे त्यांच्या आईच्या घरी होती.पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या गावी नेण्यात आले आहे.