Kirti Vyas Case : २०१८ च्या कीर्ती व्यास खून प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने तिच्या सहकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालयाने सोमवारी दोन सहकाऱ्यांना अंधेरीतील बीब्लंट सलूनमधील फायनान्स मॅनेजर कीर्ती व्यास यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. किर्तीच्या कुटुंबाने सहा वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर तिच्या सहकाऱ्यांनीच किर्तीची हत्या केल्याचे उघड झालं होतं. अखेर कोर्टानं याप्रकरणी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सहजवानी यांना दोषी ठरवलं आहे.
न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी कीर्ती व्यासचे सहकारी खुशी अजय सहजवानी आणि सिद्धेश शांताराम ताम्हणकर यांना खून, हत्येसाठी अपहरण आणि पुरावे नष्ट करणे यासह भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांसह दोषी ठरवले. मंगळवारी दोषींना ठोठावण्यात येणाऱ्या शिक्षेच्या प्रमाणावर न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील कमाल शिक्षा फाशीची आहे. मात्र सत्र न्यायालय काय शिक्षा सुनावतं याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे.
किर्ती व्यास ही १६ मार्च २०१८ रोजी दक्षिण मुंबईतील तिच्या राहत्या घरातून कामावर गेल्यानंतर बेपत्ता झाली होती. तिच्या बेपत्ता होण्याच्या जवळपास दोन महिन्यांनंतर पोलिसांनी तिच्या दोन सहकाऱ्यांनी तिची हत्या केल्याचा दावा केला होता. किर्तीचा मृतदेह कधीही सापडला नाही पण फिर्यादीने दावा केला होता की कामाच्या ठिकाणी झालेल्या वादामुळे १६ मार्च रोजी सकाळी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सहजवानी यांनी चालत्या कारमध्ये तिची हत्या केली होती. दोघांनीही याबाबत नकार दिला होता. मात्र पुराव्यांवरुन पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. आता न्यायालयाला मृतदेह सापडला नसतानाही खुनाच्या आरोपावर निर्णय घ्यावा लागला आहे.
अभिनेता फरहान अख्तरची आधीची पत्नी अधुना अख्तरच्या बी-ब्लंट सलूनमध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून किर्ती काम करत होती. चौकशीत दोन्ही आरोपींनी किर्तीचा मृतदेह वडाळा-चेंबूर दरम्यानच्या माहुल परिसरातील नाल्यात फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र मृतदेह पोलिसांना सापडला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी किर्तीच्या हत्येचा कट रचला होता. सिद्धेश आणि खुशी हे दोघे मिळून कारने किर्तीच्या घरी गेले आणि तिला घरातून सोबत घेतले. ठरल्याप्रमाणे त्यांनी किर्तीला गाडीत बसवलं. खुशीची कार बिल्डिंगच्या बाहेर पडली तेव्हा सिद्धेशने किर्तीला नोटीस परत घेण्यास सांगितले. पण किर्तीने त्याला नकार दिला. यानंतर सिद्धेशने कीर्तीची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर खुशीने कार तिच्या बिल्डिंगमध्ये पार्क केली आणि सिद्धेशसोबत कामावर निघून गेली.
किर्तीच्या मृतदेहाची कमी गर्दी असलेल्या ठिकाणी विल्हेवाट लावण्याची दोघांचा प्लॅन होता. त्यासाठी आधी त्यांनी मिठी नदीत मृतदेह फेकण्याचा बेत आखला, मात्र याठिकाणी सतत वाहनांची वर्दळ असल्याने त्यांनी माघार घेतली. यानंतर त्यांनी मृतदेह वडाळा फ्रीवेच्या नाल्यात फेकण्याचा निर्णय घेतला मात्र तेथेही गर्दी असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. हत्येनंतर दोघेही साडेनऊपर्यंत कारमध्येच मृतदेह घेऊन फिरत होते. शेवटी त्यांना वडाळा-चेंबूर दरम्यानचा माहुल परिसर योग्य वाटला आणि त्यांनी मृतदेह नाल्यात फेकून दिला.
दरम्यान, किर्तीचे बेपत्ता होण्याचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांना दोन महिने लागले होते. यादरम्यान आरोपी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी हे दोघेही पोलिस आणि पीडितेच्या कुटुंबीयांसह किर्तीला शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे कोणालाही त्यांच्यावर शंका आली नाही. मात्र खुशीच्या गाडीमध्ये किर्तीच्या रक्ताचे डाग आढळ्याने हे प्रकरण उघडीस आलं आणि दोघांनाही अटक करण्यात आली.