Join us  

गिरगावात महिलेवर जीवघेणा हल्ला; स्थानिकांनी आरोपीला पकडल्यामुळे वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 4:38 PM

गिरगात सकाळच्या सुमारात एका महिलेवर तिच्या पतीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mumbai Crime : राज्यात महिलांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आर्थिक राजधानी मुंबईतही अशाप्रकारच्या घटना सातत्याने घडत आहे. सराकाकडून अशा घटना रोखण्याचे आश्वासन वारंवार दिले जात असतानाही महिलांवर हल्ले सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात प्रेमप्रकणावरुन एका तरुणीची माथेफिरू प्रियकराने भररस्त्यात हत्या केली होती. ही घटना घडत असताना लोकांनी तरुणीला वाचवण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. त्या घटनेनंतर आता पुन्हा मुंबईच्या गिरगाव परिसरात असाच धक्कादायक प्रकार घडला.

गिरगावत सकाळच्या सुमारास एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिला कामावर जात असतानाच हा हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्राने महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सुदैवाने आजूबाजूच्या तरुणांनी हल्ला करणाऱ्याला पकडून ठेवल्याने महिलेचा जीव वाचला. या घटनेच माहिती तात्काळ व्ही पी रोड पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला.

आरोपीने घरगुती वादातून सोमवारी सकाळच्या सुमारात पत्नीवर वस्तऱ्याने हल्ला केला आणि नंतर स्वतःचे मनगट कापण्याचा प्रयत्न केला. गिरगाव परिसरातील खाडिलकर रोडवर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यात महिला गंभीर जखमी झाली आहे. सागर बेलोसे असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बेलोसेसोबत सतत वाद होत असल्याने त्याची पत्नी महिनाभरापूर्वी तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली होती.

सागरने अनेकदा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. त्यामुळे पत्नी कामावर जात असताना सागरने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या मानेला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. पत्नीवर हल्ला केल्यानंतर सागरने ब्लेडने मनगट कापून स्वतःला इजा केली. त्यानंतर महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तर सागरला शासकीय वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी सागर बेलोसेविरुद्ध व्हीपी रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस