मुंबईत मतदार याद्यांचा घोळात घोळ

By admin | Published: February 22, 2017 04:56 AM2017-02-22T04:56:47+5:302017-02-22T04:56:47+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला

In Mumbai, the crowd of voters list | मुंबईत मतदार याद्यांचा घोळात घोळ

मुंबईत मतदार याद्यांचा घोळात घोळ

Next

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, सोमवारी मुंबईत पार पडलेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान ठिकठिकाणी मतदार याद्यांत घोळ झाल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणांवरील मतदार याद्यांत मतदारांची नावे नसण्यासह एका छायाचित्रासमोर दुसरे नाव; अशा असंख्य चुका असल्याच्या तक्रारी मतदारांनी मतदान केंद्रावर उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे केल्या. महत्त्वाचे म्हणजे सायंकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत मतदार याद्यांचा घोळ सुरू असल्याने कित्येक मतदारांना मतदान करता आले नाही.
एल वॉर्डमधील चुनाभट्टी येथील प्रभाग क्रमांक १७१ मध्ये स्वदेशी मराठी शाळा मतदान केंद्रात झालेल्या मतदार याद्यांच्या घोळाने मतदारांच्या नाकीनऊ आले. प्रभाग क्रमांक १६६ मध्येही मतदार याद्यांचा घोळ काही प्रमाणात दिसून आला. येथील महापालिका शाळेत दाखल झालेल्या मतदारांना मतदान केंद्रातील बुथ क्रमांकाबाबत चुकीची माहिती मिळाल्याने संबंधितांचा वेळ रांगेत गेला.
वांद्रे पूर्वेला सरकारी वसाहत, गांधीनगर, एमआयजी कॉलनी, शास्त्रीनगर परिसर असणाऱ्या या भागातही याद्यांचा गोंधळ दिसत होता. महात्मा गांधी शाळेत मतदान बजावण्यासाठी येणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची नावेच गायब होती. प्रभाग क्रमांक ८७, ९0, ९२, ९४, ९५, ९६ मध्येही मतदानावेळी गोंधळ दिसून आला. पश्चिम उपनगरातही अंधेरीपासून बोरीवलीपर्यंतच्या मतदारांना मतदार यादीत नावे शोधताना कसरती कराव्या लागत होत्या. राजकीय पक्षांनी उभारलेल्या बुथवरही मतदारांची नावे शोधताना कार्यकर्त्यांची दमछाक होत होती. पूर्व उपनगरात राजकीय बुथवरील कार्यकर्त्यांनी मतदारांना ज्या मतदान केंद्रात जाण्याबाबत मार्गदर्शन केले, त्याबाबतही काहीसा गोंधळ उडाला होता. कारण संबंधित मतदान केंद्रावर संबंधितांचे नाव नसल्याच्या तक्रारी काही मतदारांनी ‘लोकमत’ प्रतिनिधींकडे केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: In Mumbai, the crowd of voters list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.