Join us

NCB vs Nawab Malik: कोण आहे फ्लेचर पटेल?; मंत्री नवाब मलिकांचा NCB अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 11:34 AM

Aryan Khan Arrested Case: मागील अनेक दिवसांपासून NCB विरुद्ध नवाब मलिक असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यात आता नवाब मलिकांनी ट्विटच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे.

मुंबई – क्रुझ पार्टीवर धाड टाकून NCB नं ८ जणांवर अटकेची कारवाई केली. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) यालाही अटक झाली आहे. सध्या आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये कैदेत आहे. परंतु या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी NCB वर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

मागील अनेक दिवसांपासून NCB विरुद्ध नवाब मलिक असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यात आता नवाब मलिकांनी ट्विटच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे. कोण आहे फ्लेचर पटेल? त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? याबाबतचा तपशील लवकरच येथे उघड करेन असं सांगत मलिकांनी फ्लेचर पटेलचा एक फोटो ट्विटमध्ये जोडला आहे या फोटोत एक महिलाही दिसत आहे. नेमकं हा व्यक्ती कोण याची उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. फ्लेचर पटेल हा NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या ओळखीतला असल्याचं म्हटलं आहे. 

समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

फ्लेचर पटेल या व्यक्तीला तीन केसमध्ये साक्षीदार बनीवण्यात आले. कौटुंबिक मित्र कसा स्वतंत्र साक्षीदार बनू शकतो. या फ्लेचरचे वानखेडे यांच्या निकटवर्तीय असलेल्या महिलेसमवेत फेसबुकवर फोटो, त्यावर विथ लेडी डॉन म्हणून फोटो कँप्शन लिहिलं आहे. वानखेडे हे खोट्या केसेस करुन बॉलीवूडला दबाव टाकतात हे स्पष्ट झाले. एनसीबीने  प्रेस कॉन्फरन्स घेऊन फ्लेचर पटेल, लेडी डॉन यांचा आणि कौटुंबिक मित्र असलेल्या एकाच व्यक्तीला तीन केसेस मध्ये का स्वतंत्र साक्षीदार बनविण्यात आले? याचा खुलासा करण्याचे आव्हान मलिकांनी दिले आहे.

NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा

क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी(Mumbai Cruise Drugs Case) NCBने एकूण ११ जणांना ताब्यात घेतले होते. मग यातील तिघांना कुणाच्या निर्देशावरून सोडण्यात आले, असा प्रश्न नवाब मलिकांनी उपस्थित केला होता. मलिक म्हणाले होते की, क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर टाकलेल्या छाप्यात एनसीबीने ११ जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. मात्र, अवघ्या तीन तासांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांना सोडण्यात आले. एनसीबीने कुणाच्या निर्देशावरून या तिघांना सोडले? आम्ही एनसीबीकडे यासंदर्भात सत्य काय, याचा खुलासा करण्याची मागणी करत आहोत. समीर वानखेडे आणि भाजप नेते यांच्यात काही चर्चा झाली असावी, असे आम्हाला वाटते, असेही मलिक यांनी दावा केला होता.

NCB नं दावा फेटाळला

दरम्यान, क्रूझवर २ ऑक्टोबरला टाकलेला छापा आणि कारवाई ही कायदेशीर नियमांनुसारच होती. छाप्यादरम्यान १४ जणांना कलम ६७ च्या नोटिशीनुसार ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर पुराव्याच्या आधारे त्यातील ८ जणांना अटक केली होती, तर इतरांना पुराव्याअभावी सोडण्यात आले होते. एनसीबीने एकही नियम मोडलेला नाही. गुप्त माहितीच्या आधारे ती कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांना सोडल्याचा आरोप खोटा आहे असल्याचं सांगत NCB ने नवाब मलिकांचा दावा फेटाळला.

टॅग्स :नवाब मलिकनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीआर्यन खान