मुंबई : आर्यनच्या जामिनावर शुक्रवारी सरकारी वकील आणि आर्यनच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद रंगला होता. यावेळी एनसीबीने न्यायालयाला दिलेल्या माहितीत, आर्यनच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये ड्रग्ज सेवनाबरोबर विक्रीबाबतचेही चॅट पथकाच्या हाती लागले आहेत. यात आर्यन खान रॅकेटचा भाग आहे किंवा त्याच्या नावाचा वापर होत असल्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली. त्याला जामीन मिळाल्यास तो पुरावे नष्ट करेल किंवा तपास भरकटविण्याची शक्यता असल्याचे सांगत, एनसीबीने सुनावणीदरम्यान जामीनला विरोध केला होता.
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. कारागृहाच्या क्वारंटाइन सेलमध्ये त्याला ठेवण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले. एनसीबीच्या पथकाने शनिवारी ऑक्टोबरच्या रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापा मारून आर्यन खान याच्यासह आठ जणांना ड्रग्ज आणि रोख रकमेसह अटक केली होती. त्यानंतर एनसीबीने याप्रकरणात आणखी १० आरोपींना अटक केली आहे. आर्यन खान याच्यासह सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींना न्यायालयाने गुरुवारी दिलासा देत न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, आरोपींच्या कोरोना चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्याने गुरुवारी रात्री त्यांना एनसीबी कार्यालयात न्यायालयीन कोठडीत ठेवले होते.
शुक्रवारी आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज किल्ला कोर्टाने फेटाळल्याने आर्यनसह अन्य आठही आरोपींना आर्थर रोड कारागृहात नेले. कारागृहाच्या कोविड नियमांनुसार, कारागृहातील क्वारंटाइन सेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर आरोपींना अन्य कैद्यांसोबत ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणात ड्रग्ज पार्टीचे आयोजक, ड्रग्ज सप्लायर आणि नायजेरियन तस्कराला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एनसीबीची कारवाई सुरू असून, पुरावेसुद्धा गोळा करण्याचे काम सुरू आहे.
नायजेरियन तस्कर मुख्य आरोपी ?क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने गुरुवारी चिनेडू इगवे या नायजेरियन तस्कराला अटक केली. त्याच्याजवळून एस्टॅसीच्या १५ ग्रॅमच्या ४० गोळ्या आणि एमडीएम ड्रग्ज काही प्रमाणात जप्त केले आहे. शुक्रवारी त्यालाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात त्याला मुख्य आरोपी दाखवण्याची शक्यता आहे. एनसीबी त्याच्याकडे या प्रकरणी कसून चौकशी करत आहे.