Aryan Khan Arrested: महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे प्रकार; शिवसेना आर्यन खानच्या पाठिशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 09:35 AM2021-10-09T09:35:53+5:302021-10-09T09:36:31+5:30
Mumbai Drugs Case; केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचं काम सुरु आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे.
मुंबई : सीबीआय, ईडी, आयकर अशा सर्व केंद्रीय यंत्रणांना उभ्या देशात कोणतेही काम नाही. सर्व भ्रष्ट माणसे महाराष्ट्रातच आहेत, अशा पद्धतीने काम सुरू आहे. महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे असे प्रकार सुरू आहेत. यातून महाराष्ट्राच्या अर्थकारणावर परिणाम होत असल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते, खासदार अरविंद सावंत यांनी केला.
महाविकास आघाडीतील पक्षांनी ११ ऑॅक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार आहे. शिवसेनेच्या सर्व आघाड्या, भारतीय कामगार सेना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या बंदला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. डावे पक्ष, सर्व संघटना, युनियन या बंदमध्ये असणार आहेत, असेही सावंत म्हणाले. केंद्र सरकार ज्या पद्धतीने राष्ट्रीय धोरण राबवीत आहे, गोरगरीब फसवणूक आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे त्याचा परमोच्च बिंदू लखीमपूर खेरी येथील घटनेने गाठला आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलानेच गाडी घातली, हा लोकशाहीवरचा डाग आहे. शेतकऱ्यांना चिरडून टाकणारे कृषी कायदे, कामगारांना उद्ध्वस्त करणारे कामगार कायदे यासोबतच अत्यंत बेछूट पद्धतीने देशात खासगीकरण सुरू आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद पुकारण्यात येत असल्याचे सावंत म्हणाले.