Join us

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा वंदे भारत आता ६ दिवस; नवे वेळापत्रक कधीपासून?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 1:29 PM

Mumbai CSMT Goa Madgaon Vande Bharat Express: कोकण, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

Mumbai CSMT Goa Madgaon Vande Bharat Express: मुंबईहून सुटणाऱ्या मध्य रेल्वेवरील वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबीयासह सहलीचे नियोजन करत असून, वंदे भारतमधून १५ ते ३० वर्षे वयोगटातील आणि ३१ ते ४५ वर्षे वयोगटातील सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच मुंबईहून गोव्याला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता दररोज धावणार आहे. काही दिवसांत नवे वेळापत्रक लागू होणार आहे.

मुंबई आणि गोवा मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस आताच्या घडीला आठवड्यातील ३ दिवस चालवली जाते. मात्र, आता ही वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवार सोडून बाकी सगळे ६ दिवस चालवली जाणार आहे. दिवाळी सुट्टी आणि नववर्ष स्वागत करण्यासाठी कोकण, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. कोकण रेल्वेवर एक नोव्हेंबरपासून गैर-पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. यामुळे सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी वंदे भारतची सफर प्रवाशांना शुक्रवारवगळता दररोज अनुभवता येणार आहे. 

१ नोव्हेंबरपासून गैर-पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वेवर लागू 

मान्सूनने निरोप घेतल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. यामुळे नियोजनानुसार बुधवार, १ नोव्हेंबरपासून गैर-पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वेवर लागू करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. सध्या ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. एक नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक लागू झाल्याने वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. शुक्रवारी देखभाल-दुरुस्तीसाठी वंदे भारत धावणार नाही. दिवाळी सुट्टी तसेच नववर्ष स्वागतासाठी गोव्याकडे कूच करणाऱ्या पर्यटकांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेवरील प्रतिष्ठित हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेससह एकूण ४४ मार्गावरील ८८ रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे. यात प्रवासी पसंतीच्या जनशताब्दी, तेजस, दुरांतो, मत्स्यगंधा, हमसफर, मांडवी, मरूसागर, कोकणकन्या, तुतारी, गोवा संपर्क क्रांती यांचा समावेश आहे. पावसाळ्यात कोकणात तुफानी पाऊस बरसत असल्याने कोकण रेल्वेवर दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. यामुळे पावसाळी वेळापत्रकात कोकण रेल्वेवरील विभागात ताशी ७५ किमी अशी वेगमर्यादा असते. गैर पावसाळी वेळापत्रकात अशी ठराविक वेगमर्यादा नसते. यामुळे कमाल वेगाच्या नियमानुसार मेल-एक्स्प्रेस धावतात. मुंबई-गोवा मार्गावर काही भागांसाठी रेल्वेगाड्यांना १०० ते १२० ताशी किमी या वेगाची मंजुरी आहे. 

टॅग्स :वंदे भारत एक्सप्रेसमुंबईगोवाकोकण रेल्वेभारतीय रेल्वे