Mumbai CST Bridge Collapse: दुर्घटनास्थळी बघ्यांची गर्दी अन् रस्त्यावर शुकशुकाट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 05:55 AM2019-03-16T05:55:32+5:302019-03-16T05:55:44+5:30
दैनंदिन वापरातील पूल नष्ट झाल्याने नोकरदारांची गैरसोय; लवकरच दुसरा पादचारी पूल उभारण्याची मागणी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील दादाभाई नौरोजी (डीएन) मार्गावरील पादचारी पूल गुरुवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ निष्पाप व्यक्तींना नाहक जीव गमवावा लागला. त्यानंतर, शुक्रवारी सकाळी येथे बघ्यांची गर्दी झाली होती. एखादे प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी आल्याप्रमाणे लोक मोठ्या संख्येने येथे आले होते, तर दुसरीकडे पुलाचा उर्वरित भाग पाडण्याचे काम हाती घेण्यात आल्याने, डीएन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी हा एकमेव पादचारी पूल अस्तित्वात होता. मात्र, तो नष्ट झाल्याने नोकरदारांना आता महात्मा फुले मंडईच्या दिशेने जाण्यासाठी रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या पुलाचा वापर करावा लागत आहे. शुक्रवारी या पादचारी पुलाचा उर्वरित भाग पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे डीएन मार्गाच्या दोन्ही मार्गिका बंद केल्या होत्या. जे.जे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने, सीएसएमटीकडे येणारी वाहतूक पूर्णत: ठप्प होती. त्यामुळे नेहमी वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या या परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र होते.
नागरिकांना अंजुमन इस्लामपर्यंत येऊन पुन्हा माघारी जावे लागत होते. अंजुमन इस्लामच्या व्यवस्थापनाने नागरिकांच्या सोयीसाठी संस्थेच्या मागील बाजूला असलेले प्रवेशद्वार उघडले होते. त्यामुळे या मार्गाने नागरिकांना थेट पुढे येणे शक्य होत होते. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा मार्ग उघडण्यात आल्याची माहिती अंजुमन इस्लामचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांनी दिली.
रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय, हज हाउस, महात्मा फुले मंडई, काळबादेवी, आझाद मैदान, कामा रुग्णालय, जीटी रुग्णालय या दिशेने जाण्यासाठी या पादचारी पुलाचा वापर केला जात असे. त्यामुळे दिवसभरात लाखो प्रवाशांकडून या पुलाचा वापर दररोज होत असे. मात्र, आता हा पूल अस्तित्वात नसल्याने रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना भुयारी मार्गाचा वापर करावा लागेल, अन्यथा माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकाजवळून रस्ता ओलांडावा लागणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात प्रवेशासाठी प्रवाशांना मोठा वळसा मारावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी या ठिकाणी चांगल्या दर्जाचा दुसरा पादचारी पूल लवकरात लवकर उभारण्याची मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.
...तर दुर्घटना टळली असती
हा पूल चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाई यांनी आॅगस्ट २०१८ मध्ये दिला होता. या पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याची शिफारस देसाई यांनी केली होती. त्यांनी केलेल्या बहुतांशी पुलाच्या आॅडिट अहवालांत ते पूल चांगल्या स्थितीत असल्याचे म्हटले आहे. मात्र पुलांच्या आॅडिटमध्ये निष्काळजी व बेपर्वाई करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. आॅडिट करताना पुलाच्या स्थैर्याकडे दुर्लक्ष केल्याचे ताशेरे आयुक्तांनी ओढले आहेत. पुलाचे आॅडिट करताना काळजी घेतली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा निष्कर्ष आयुक्तांनी काढला आहे.
आॅडिटरची हकालपट्टी
महाड येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिकेनेही मुंबईतील ३७४ पुलांचे आॅडिट केले. शहर भागातील पुलांच्या आॅडिटचे काम प्रा. डी. डी. देसाई असोसिएटेड इंजिनीअरिंग कन्सल्टन्ट यांच्यामार्फत करण्यात आले आहे. मात्र पुलांच्या आॅडिटमध्ये त्यांनी बेपर्वाई केल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे.
पुलाच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करून त्यांनी सत्य परिस्थिती लपवली. त्यामुळे या घटनेसाठी त्यांना जबाबदार धरत पालिकेच्या पॅनलवरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच शासकीय पॅनलवरूनही त्यांची हकालपट्टी करण्यास सांगितले आहे.