मुंबई - काल झालेल्या सीएसएमटी पुल दुर्घटना प्रकरणाची मुंबई हायकोर्टात २२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. तसेच एलफिन्स्टन पुल दुर्घटनेप्रकरणी दाखल याचिकेत कालच्या दुर्घटनेचा मुद्दा वाढवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. ही याचिका वकील नितीन सातपुते यांनी दाखल केली आहे.
मुंबईत सतत होणाऱ्या पुल दुर्घटनांप्रकरणी रेल्वे जनरल मॅनेजर, पालिका आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या मुख्य याचिकेत करण्यात आली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाला जोडणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग कोसळला. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जबाबदार मध्य रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाच्या दुर्घटनेवरून आरोप - प्रत्यारोप सुरू झाले असून रेल्वेकडून दुरुस्तीची परवानगी मिळाली नसल्याचा महापौरांनी आरोप केला आहे तर हा पूल महापालिकेच्या अखत्यारीत असल्याचा दावा रेल्वेनं केला आहे.