Join us

Mumbai CST Bridge Collapse; शिवसेनेनेच मुंबईचं वाटोळे केलं - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 3:48 PM

शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती. असा टोला लगावतानाच मुंबईचे वाटोळे शिवसेनेने केले अशी जोरदार टिकाही जयंत पाटील यांनी केली.  महानगरपालिकेत युतीचे सरकार आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला पूल कोसळल्याच्या दुर्घटनेसाठी जाब विचारला पाहिजे. तकलादूपणा बंद करा. ऑडिट फेल झालं ही बाब गंभीर आहे. सरकारचे कामाकडे लक्ष नाही असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला. 

सीएसएमटी येथे घडलेल्या घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी भेट दिली. शिवाय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली. त्यानंतर मिडीयाशी बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबईत पूल कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली आहे परंतू या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यू झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं होते त्यानंतरही घटना घडली. याचा अर्थ स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतं हे पहिल्यांदा कळलं आहे. ऑडिट करताना वरवर काम केलं गेलं त्यामुळे ही घटना घडली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

जी टी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळी महापालिका आणि रेल्वे विभागाने टोलवाटोलवी केली. लोकांचे प्रश्न सोडवा टोलवाटोलवी करू नका, भुयारी मार्ग निर्माण करा ज्यामुळे पुन्हा अशा घटना घडणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.  गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीला जोडणारा हिमालय पादचारी पूल कोसळला, यात 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले,या जखमींची विचारपूस करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.   

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनामुंबईशिवसेनाउद्धव ठाकरेजयंत पाटील