Mumbai CST Bridge Collapse - सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव, राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 08:07 AM2019-03-15T08:07:31+5:302019-03-15T12:41:15+5:30
आता रेल्वेमंत्री नेहमीप्रमाणे ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील,अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला
मुंबई - गुरुवारी रात्रीच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पुल कोसळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आणि रेल्वेमंत्र्यांवर निशाना साधला आहे. ही घटना दुर्दैवी आहे आणि मनसे अपघातग्रस्तांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात सामील आहे. नेहमीप्रमाणे रेल्वेमंत्री ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील, मनसेने सनदशीर मार्गाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला, पण सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा हिमालय पादचारी पूल कोसळला, या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन रेल्वे प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे. ही घटना दुर्दैवी आहे आणि मनसे अपघातग्रस्तांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “सप्टेंबर २०१७ साली एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीत अनेक मुंबईकरांना जीव गमवावा लागला होता, जुलै २०१८ साली अंधेरीतही असाच एक पादचारी पूल कोसळला होता आणि आता सीएसएमटी स्थानकातील पूल कोसळला. एल्फिन्स्टनच्या दुर्दैवी घटनेनंतर मनसेने रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळेला रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबईतील पुलांचे ऑडिट करु असे आश्वासन दिले होते. पण रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेने सहकार्य करावे, असे सांगितले. यानंतर मी महापालिका आयुक्तांनाही भेटलो. त्यांनी देखील सहकार्याचे आश्वासन दिले. पण पुढे काहीच घडले नाही, हे सिद्ध झाले”, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
#MumbaiBridgeCollapsepic.twitter.com/3HBJNooJST
— Raj Thackeray (@RajThackeray) March 14, 2019
आता रेल्वेमंत्री नेहमीप्रमाणे ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील,अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
एलफिन्स्टन रेल्वे पूल दुर्घटनेनंतर मनसेकडून रेल्वे पुलांचे ऑडिट केलं जावं अशी मागणी करण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर मनसे रेल्वे परिसर मोकळे करण्यासाठी फेरिवाल्यांच्या विरोधात आंदोलन उभं केलं होतं. ऐन निवडणुकीच्या काळात अशा दुर्देवी घटनेमुळे सत्ताधाऱ्यांना टीकेचं लक्ष्य केलं जाणार हे नक्की