मुंबई- काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंला लक्ष्य केलं आहे. पेंग्विनकडे विशेष लक्ष आणि नाईट लाईफचा मुद्दा लावून धरण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका का करत नाही?, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. पुन्हा तेच आरोप-प्रत्यारोप आणि पुलाचे ऑडिट करण्याच्या घोषणा होतील, पण ठोस काहीच होणार नाही. सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेला मनुष्यजीवाची काहीच किंमत नाही काय, असा टोलाही नितेश राणेंनी पालिकेच्या आडून शिवसेनेला लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून दादाभाई नौरोजी मार्गापलीकडे जाण्यासाठी वापरात असलेल्या पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी भरगर्दीच्या वेळी भरधाव वाहनांनी भरलेल्या रस्त्यावर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत तीन महिलांसह 6 जणांचा मृत्यू, तर 30हून अधिक जण जखमी झाले. दुर्घटनास्थळी कोसळलेले ढिगारे उपसण्याचे काम सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.